महासभेत रस्तेप्रश्नी प्रशासनावर हल्लाबोल

By admin | Published: January 19, 2017 12:24 AM2017-01-19T00:24:26+5:302017-01-19T00:24:26+5:30

नगर अभियंत्यांचा पगार थांबविला : कुपवाड रस्त्याबाबत ठेकेदारांच्या चौकशीचे आदेश

In the General Assembly attack on the administration of the road | महासभेत रस्तेप्रश्नी प्रशासनावर हल्लाबोल

महासभेत रस्तेप्रश्नी प्रशासनावर हल्लाबोल

Next


सांगली : शहरातील शंभर फुटी रस्ता, कुपवाड सूतगिरणी ते ओम पेंटस् या रस्त्यांच्या कामावरून बुधवारी महासभेत नगरसेवकांनी प्रशासनावर हल्लाबोल केला. संबंधित ठेकेदाराची चौकशी करून कारवाई करण्यासाठी महापौर हारुण शिकलगार यांनी आयुक्तांना आठ दिवसांची मुदत दिली, तर शामरावनगरमधील गटारीचे काम चार वर्षे रेंगाळल्याबद्दल नगरअभियंता आर. पी. जाधव यांचा पगार थांबविण्याचे आदेश महापौरांनी दिले.
महापालिकेची महासभा महापौर शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेच्या सुरुवातीलाच नागरी प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरले. उपमहापौर विजय घाडगे यांनी पिठासनावरून खाली उतरून सूतगिरणी ते ओम पेंटस् हा दीड कोटी रुपयांचा रस्ता निकृष्ट झाल्याचा आरोप केला. सूतगिरणी ते कुपवाड या रस्त्यापैकी निम्मा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केला जात आहे. त्याचे काम दर्जेदार होते; पण महापालिकेच्या कामात गुणवत्ताच नाही. केवळ ठेकेदाराला पोसण्याचा उद्योग प्रशासनाकडून सुरू आहे. रस्ता केल्याचा दिखावूपणा केला जात असल्याचा थेट आरोप करीत महापालिकेच्या बांधकाम विभागाची लक्तरे वेशीवर टांगली. नगरसेवक गजानन मगदूम, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते यांनीही मूळ अंदाजपत्रकाप्रमाणे रस्ता झाला नसल्याने ठेकेदाराचे बिल देऊ नये, त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली.
महापौर हारुण शिकलगार यांनी रस्त्यांच्या निकृष्ट कामामुळे सत्ताधाऱ्यांची बदनामी होत आहे. अधिकारी कार्यालयात बसून ठेकेदारांची बिले काढतात. गत सभेत एका कामासंदर्भात ठेकेदाराचे बिल काढले जाऊ नये, असे आदेश दिले होते, तरीही ठेकेदाराला ५० लाख अदा करण्यात आले. कुपवाडच्या रस्त्याबाबत आयुक्तांनी संपूर्ण चौकशी करून, येत्या आठ दिवसांत दोषी ठेकेदारांवर कारवाई करावी, तसेच या कामाची वालचंद महाविद्यालयाकडून तपासणी करून घ्यावी, असे आदेश दिले. नगरसेविका मृणाल पाटील, दिग्विजय सूर्यवंशी यांनी शंभर फुटी रस्त्याचा प्रश्न मांडला. अजून रस्ता पूर्ण झालेला नसताना ठेकेदाराला २ कोटी ९० लाखांचे बिल देण्यात आले आहे. केवळ ५० ते ६० लाखांचे बिल शिल्लक असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावरून सभेत गदारोळ झाला.
नगरसेवक गौतम पवार यांनी शामरावनगरमधील समस्यांचा पाढा वाचला. तत्कालीन आमदार संभाजी पवार यांच्या निधीतून शामरावनगरमधील पाण्याचा निचरा करण्यासाठी गटारीचे काम हाती घेण्यात आले. गेली चार वर्षे हे काम सुरू आहे, असे सांगत, सभागृहात त्यांनी शामरावनगरमधील समस्यांचे डिजिटल फलकच झळकविले. नगरअभियंता आर. पी. जाधव यांचा पगार थांबविण्याची मागणीही पवार यांनी केली. नगरसेविका अलका पवार यांनी, भोबे गटारीला शामरावनगरमधील गटार जोडली नसल्याने सांडपाणी साचून असल्याचे सांगितले. या प्रश्नांवर प्रशासन झोपले आहे का? असा सवाल सुरेश आवटी यांनी केला. काम रेंगाळल्याबद्दल ठेकेदारावर दंडात्मक कारवाईची मागणी विष्णू माने यांनी केली. नगरअभियंता जाधव यांनी, मोकळ्या प्लॉटमध्ये पाणी असल्याने गटारीचे काम रखडल्याचे सांगितले. येत्या मार्चपर्यंत गटारीचे काम पूर्ण करून घ्यावे, तोपर्यंत जाधव यांचा पगार थांबविण्याचे आदेश महापौर शिकलगार यांनी प्रशासनाला दिले. (प्रतिनिधी)

Web Title: In the General Assembly attack on the administration of the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.