कडेगाव : क्रांतिअग्रणी जी. डी. (बापू) लाड यांचे जीवनचरित्र प्रकाशित करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांना दिले. त्यामुळे आता स्वातंत्र्यसेनानींचे जीवनचरित्र प्रकाशनाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.पालकमंत्री पाटील कार्यक्रमानिमित्त कडेगाव येथे आले असताना, त्यांनी कुंडलच्या क्रांती साखर कारखान्यास सदिच्छा भेट दिली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गोरखनाथ औंधे यांनी जी. डी. बापूंचे जीवनचरित्र प्रकाशनाचे निवेदन अरुण लाड यांच्याहस्ते त्यांना दिले.यावेळी पाटील म्हणाले की, राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळाच्या वाङ्मय प्रकल्प समितीपुढे हा विषय निर्णयार्थ ठेवलेला आहे. या समितीच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून, ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ या मालिकेत हे जीवनचरित्र प्रकाशित करण्याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल.जी. डी. बापूंचे जीवनचरित्र म्हणजे एका संघर्षयात्रेचा इतिहास आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेतून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. तुफान सेनेचे सेनापती असलेल्या बापूंनी सहकाऱ्यांसमवेत इंग्रज अधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडले. अशा थोर क्रांतिअग्रणींचे कार्य व कर्तृत्वाचा इतिहास नव्या पिढीसमोर येण्याची गरज आहे. यासाठीच जीवनचरित्र प्रकाशनाबाबतचा निर्णय लवकरच घेणार आहे, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. यावेळी युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शरद लाड उपस्थित होते. (वार्ताहर)औंधे यांच्या प्रयत्नांचे फलितवांगी येथील सामाजिक कार्यकर्ते गोरखनाथ औंधे, क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांचे जीवनचरित्र प्रकाशनाबाबतची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. परंतु आघाडी शासनाच्या काळात वाङ्मय प्रकल्प समिती बरखास्त झाली होती, त्यामुळे हा विषय रखडला होता. आता भाजप शासनाने ही समिती पुनर्गठित केली आहे व पालकमंत्री पाटील यांनी जीवनचरित्र प्रकाशनाबाबतचे आश्वासन दिले आहे.
जी. डी. बापूंंचे जीवनचरित्र प्रकाशित करणार
By admin | Updated: September 17, 2015 23:45 IST