मालगाव : जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथे बंदुकीची गोळी लागून अपघाती मृत्यू झालेले जवान महादेव बाजीराव पाटील यांच्यावर गुरुवारी सकाळी खंडेराजुरी (ता. मिरज) या त्यांच्या गावी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. लहान भाऊ शरद बाजीराव पाटील यांनी पार्थिवास भडाग्नी दिला. जवान पाटील यांच्या मृत्यूने गेले चार दिवस गावावर शोककळा पसरली होती.महादेव पाटील जम्मू काश्मीर येथील अनंतनाग येथे सैन्य दलात कार्यरत होते. सेवा बजावत असताना त्यांचा दि. २ जूनरोजी बंदुकीतील गोळी लागून अपघाती मृत्यू झाला होता. तीन दिवसानंतर दि. ५ रोजी त्यांचे पार्थिव जम्मू काश्मीरहून पुणे येथे आणण्यात आले. पुणे येथे सैन्य दलाच्यावतीने मानवंदना दिल्यानंतर दि. ४ जूनरोजी रात्री दोन वाजता सांगलीत व पहाटे सहा वाजता खंडेराजुरी येथे आणण्यात आले. पार्थिवासोबत सैन्य दलातील सुभेदार किशन औटी, नायब सुभेदार युवराज क्षीरसागर, नाईक प्रमोद गुडुळकर, सांगली एनसीसीचे सुभेदार प्रकाश कांबळे होते. यावेळी आई मालन, वडील बाजीराव यांनी दर्शन घेतले. भाऊ शरद पाटील यांनी भडाग्नी देऊन महादेव यांना अखेरचा निरोप दिला. (वार्ताहर)
जवान पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार
By admin | Updated: June 6, 2014 00:32 IST