लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : जिल्ह्यात १५ मेपर्यंत कडक लॉकडाऊन आहे, मात्र इस्लामपुरात नागरिकांचा रस्त्यावरील वावर कमी होत नसल्याचे चित्र आहे. पोलिसांनी नाकाबंदी करूनही त्यांना गुंगारा दिला जात आहे. त्यातच बाजार समितीच्या आवारात सकाळच्या सत्रात भाजी विक्रेत्यांची झुंबड उडत आहे.
वाळवा तालुका कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत सर्वात पुढे आहे. तालुक्यात रोज दोनशेवर रुग्ण आढळून येत आहेत. काही खासगी रुग्णालयांनी रक्त, एक्स-रे, एचआरसीटी आदी तपासण्यांची सोय करून औषधोपचारही सुरू केले आहेत. त्यामुळे अशा रुग्णालयांकडे रुग्णांचा कल मोठ्या प्रमाणात आहे. मात्र तेथे रुग्णांसह नातेवाईकांची गर्दी उसळत आहे.
शहरातील सर्व सीमांवर आणि प्रमुख चौकांत सकाळच्या सत्रात पोलिसांचा ताफा असतो. तेथे दोन ते तीन तास कारवाई होते. पोलिसांची कारवाई थांबल्यानंतर रस्त्यावर पुन्हा नागरिकांची वर्दळ दिसते. बाजार समितीने भाजीपाला, धान्याचे लिलाव बंद केले आहेत. मात्र पहाटे पाचपासून सातपर्यंत बाजार समितीच्या आवारात भाजीपाल्याचे बाहेरील व्यापारी येऊन मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. तेथे भाजी विक्रेत्यांची झुंबड उडत आहे. बाजार आणि रस्त्यावरील भाजीपाला विक्री बंद असल्याने तेथे ग्राहकांचीही संख्या वाढत आहे. यावर बाजार समिती, नगरपालिका प्रशासन आणि पोलिसांचे नियंत्रण राहिलेले नाही. असा मुक्तसंचार असल्यामुळे शहर व परिसरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत.
कोट
शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या चारचाकी व दुचाकीस्वारांची कसून चौकशी केली जाते. विवध कारणे सांगून नागरिक सुटका करून घेतात. काहींवर खटले दाखल करून दंड वसूल केला जातो, तरीही बरेचजण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.
- अशोक जाधव, शहर वाहतूक निरीक्षक, इस्लामपूर