मिरज : मिरजेतील मिरज औद्योगिक वसाहत रस्त्यावर शिवशक्तीनगरमध्ये तीन महिन्यांचे कोल्ह्याचे पिलू आढळले. त्यास प्राणीमित्रांनी ताब्यात घेतले आहे.
या परिसरात दोन ते तीन दिवस कोल्ह्याचे पिलू फिरताना नागरिकांना दिसले होते. मादी कोल्ह्याच्या शोधासाठी प्राणीमित्र अशोक लकडे यांना नागरिकांनी पाचारण केले. अशोक लकडे यांनी शिवशक्तीनगरमध्ये जाऊन कोल्ह्याच्या पिलास पकडले. तीन महिने वयाच्या या कोल्ह्याच्या पिलाची वैद्यकीय तपासणी करून वनविभागाच्या ताब्यात देणार असून मोकाट कुत्र्यांकडून या कोल्ह्याच्या पिलाच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी त्यास सुरक्षित ठेवण्यात आल्याचे लकडे यांनी सांगितले.
नागरी वस्तीत कोल्हा आढळल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत होते. सांगली शहरात काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या आगमनाने खळबळ उडवून दिली होती. आता मिरजेत कोल्ह्याचे पिलू सापडले. त्याची आई या परिसरातच असल्याची शक्यता असल्याने नागरिक व प्राणीमित्रांनी या कोल्ह्याच्या पिलाच्या आईचा या परिसरात शोध घेतला. मात्र, आई सापडली नाही. जंगलातून वन्य प्राणी नागरी वस्तीत येत असल्याने वनविभागाने याबाबत उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली.