सांगली : महापालिका क्षेत्रातील कचरावेचक महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचे मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सभापती गीतांजली ढोपे-पाटील यांनी गुरुवारी दिली. यासह महापालिका शाळात शिक्षण घेतलेल्या ९ ते १२ वीपर्यंतच्या मुलींना शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अनलाॅकनंतर महिला व बालकल्याण समितीची पहिली बैठक नुकतीच झाली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ढोपे-पाटील म्हणाल्या की, आतापर्यंत ब्युटीपार्लर, फॅशन डिझायनिंग, कराटे अशी प्रशिक्षणे समितीच्यावतीने दिली जात होती. आता कचरावेचक महिलांना मोफत चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका शाळेतील मुलींनाही कराटेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. शहरातील महिलांच्या समस्या, तक्रारींचे निवारण करण्यासाठी समुपदेशन केंद्रही उभारण्यावर बैठकीत सहमती झाली आहे.
महापालिका शाळेतील मुलींचे आर्थिक कारणावरून आठवीनंतर शिक्षण थांबते. त्यासाठी या मुलींना ९ ते १२ वीपर्यंत शिष्यवृती दिली जाईल. त्यातून या मुलींचे शिक्षण पुढे सुरू राहण्यास मदत होणार आहे. शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारणे, प्रसूतिगृहाची सुधारणा, महिला बचत गटांना महापालिकेची कामे देणे, महापालिकेत महिलांसाठी स्वतंत्र विश्रांती कक्ष, आदी निर्णयही बैठकीत घेण्यात आल्याचे ढोपे-पाटील यांनी सांगितले.