सांगली : जिल्ह्यात ‘स्वाइन फ्लू’चे आणखी चार संशयित रुग्ण शनिवारी सापडले आहेत. यामध्ये दोघांना लागण झाली आहे, तर दोघांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. लागण झालेले रुग्ण सांगली व कोथळी (ता. शिरोळ) येथील आहेत. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गेल्या चार दिवसात दररोज रुग्ण सापडू लागल्याने भीतीचे वातावरण आहे. दोन दिवसापूर्वी किर्लोस्करवाडी (ता. पलूस) व नाटवडे (ता. शिराळा) येथील दोघांचा स्वाइनने मृत्यू झाला होता. याशिवाय दररोज संशयित रुग्ण शासकीय व खासगी रुग्णालयात सापडत असल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. शनिवार सापडलेले चारही रुग्ण परगावी गेले होते. त्यांना गेल्या दहा ते बारा दिवसांपासून ताप व खोकल्याचा त्रास सुरु आहे. खासगी रुग्णालयात त्यांनी औषधोपचार घेतले, पण त्यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही. उलट दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यांना स्वाईनची लागण झाली असावी, असा संशय व्यक्त करुन उपचारार्थ शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांनाही काळजी घेण्याची सूचना डॉक्टरांनी केली आहे. चारपैकी दोन रुग्णांना स्वाईनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडे खासगी रुग्णालयाचा अहवाल आहे. तरीही पुन्हा त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल मंगळवारपर्यंत येण्याची शक्यता आहे. संशयित दोन रुग्णांचेही रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. परंतु त्यांना स्वाईनची लागण झाल्याची शक्यता गृहीत धरुन उपचार सुरु केले आहेत. स्वाइन फ्लू कक्षाच्या परिसरात डॉक्टर, कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक तोंडाला मास्क लाऊन फिरत आहेत. रुग्णालयाच्या आवारात औषधांची फवारणी केली जात आहे. स्वाईनबाबत काय काळजी घ्यावी, याची भित्तीपत्रके लावली जात आहेत. (प्रतिनिधी)
‘स्वाईन फ्लू’चे आणखी चार रुग्ण
By admin | Updated: September 5, 2015 23:32 IST