सांगली : एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या भाजप व राष्ट्रवादीतील नेत्यांना आता एकमेकांशी जुळवून घेत मैत्रीची औपचारिकता पार पाडावी लागणार आहे. राज्यातील राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये झालेली जवळीक आता जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम करू लागली आहे. सांगली जिल्ह्यात अनेक मतदारसंघात दोन्ही पक्षांमधील नेत्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जोराचा संघर्ष झाला होता. एकमेकांवर टोकाचे आरोपही करण्यात आले. माजी मंत्री आर. आर. पाटील आणि खासदार संजय पाटील यांच्यातील राजकीय वैर तर राज्याला परिचित आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या राजकीय संन्यासाच्या पैजाही या दोन्ही नेत्यांनी लावल्या होत्या. टोकाचा संघर्ष व जहरी टीका करून एकमेकांना घायाळ करणाऱ्या या दोन्ही नेत्यांना आता राज्यातील बदलत्या समीकरणांबरोबर बदलावे लागणार आहे. यापूर्वीही एकदा त्यांनी एकत्र येऊन मैत्रीचा प्रयत्न केला होता. पाच-सहा वर्षे रडतखडत त्यांनी मैत्रीची औपचारिकता पूर्ण केली होती. त्यानंतर पुन्हा त्यांच्यातील टोकाचा संघर्ष जिल्ह्याने पाहिला. राज्यात दोन्ही पक्षांचे सूत जुळल्याने त्यांनाही आता एकमेकांशी जमवून घ्यावे लागणार आहे. नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत संजय पाटील यांनी आर. आर. पाटील यांच्यावर टीका करणे टाळले होते. त्यांनी या कृतीतून आता औपचारिक मैत्रीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. खासदार राजू शेट्टी आणि आर. आर. यांच्यातही अनेकदा संघर्ष झाला. या दोन्ही नेत्यांनीही एकमेकांचे वस्त्रहरण केले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपशी मैत्री केल्याने त्यांनाही आता या बदलत्या समीकरणांचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. तासगाव तालुक्यात त्यांची संघटना आर. आर. यांच्याविरोधात संघर्ष करीत होती. आता नव्या समीकरणांमुळे हा विरोधही मावळणार का?, असा प्रश्न निर्माण होणार आहे. स्वाभिमानीच्या प्रत्येक नेत्याने आर. आर. यांच्याविरोधात भाषणे केली होती. त्यामुळेच या दोन्ही पक्षांमधील आगामी नात्याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. शिवाजीराव नाईक आणि जयंत पाटील यांच्यातील संघर्षावर या बदलत्या राजकारणाचे काय परिणाम होणार, हासुद्धा उत्सुकतेचा विषय आहे. जत तालुक्यातील एकमेकांविरोधात लढणारे विलासराव जगताप आणि प्रकाश शेंडगे यांचीही गोची नव्या समीकरणांमुळे होण्याची शक्यता आहे. सांगली, मिरज, कडेगाव-पलूस याठिकाणची दोन्ही पक्षांतील मैत्री यापूर्वीच घट्ट झाल्याने तिथे काही फरक पडणार नाही. अन्य मतदारसंघात याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम दिसण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आता भाजपला केलेल्या सहकार्याच्या गोष्टी खासगीत स्पष्टपणे सांगण्यास सुरुवात केली आहे.
कट्टर विरोधकांवर औपचारिक मैत्रीची वेळ
By admin | Updated: November 17, 2014 23:22 IST