कौसेन मुल्लामिरज : भारत भ्रमणसाठी निघालेल्या परदेशी नागरिकांना महाराष्ट्रात आल्यावर सांगलीच्यामिरजेचेपोलिस ठाण्यात जावे लागले. आश्चर्य म्हणजे रिक्षाने प्रवास करणाऱ्या या तीन ऑस्ट्रेलियन नागरिकांचा हेतू जाणून घेतल्यावर शिक्षेऐवजी पोलिसांकडून पाहुणचार मिळाला. त्यामुळे ते भारावून गेले.देशाच्या दक्षिणेतील केरळ राज्यातून प्रवासाला सुरवात झाली. राजस्थानच्या जैसलमेरकडे प्रवास करताना महाराष्ट्राच्या हद्दीत हे परदेशी पाहुणे चक्क रिक्षातून फिरत मिरजेत आले. नाक्यावरील असलेल्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी या तिन्ही ऑस्ट्रेलियन नागरिकांकडून वाहतूक नियमांचे पालन होत आहे का, याची तपासणी करून विचारपूस केली. यावेळी रिक्षात पाच लिटर पेट्रोल असलेले दोन कॅन सापडले. त्यामुळे पोलिसांनी रिक्षा थेट मिरज पोलिस ठाण्याकडे घेण्यास सांगितले.
कॉफी मिळाल्याचा सुखद धक्का..परदेशी पाहुण्यांची रिक्षा पोलिस ठाण्यात पोहचल्यानंतर संबंधितांना वाहतुकीचे नियम सांगण्यात आले. तसेच, पेट्रोल हा ज्वलनशील पदार्थ असल्याने त्याची वाहतूक करता येणार नाही. तसेच, मद्य पिऊन प्रवास करू नये, वाहतूक नियमांचे पालन करावे, अशा सूचना दिल्या. त्यांच्याकडे ऑल इंडिया परमिटची परवानगी होती. त्यामुळे या पाहुण्यांचे स्वागत व आदरातिथ्य केले. त्यांना आवडणारी कॉफी देऊन सुखद धक्का दिला. तसेच, पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे परदेशी पाहुणे पोलिसांच्या आदरातिथ्याने भारावून गेले.
"पोलीस ठाण्यात जाताना आमच्यावर काहीसे दडपण आले होते. पण पोलिसांकडून मिळालेला पाहुणचार पाहून समाधान वाटले. कॉफी घेतली. हा सुखद अनुभव मिळाला." - एमा, ऑस्ट्रेलियन नागरिक
"केरळातून निघालेले जैलसमेरला निघालेले ॲास्ट्रेलियन नागरिक मॅट, टीम आणि एमा यांना वाहतुकीचे नियम सांगण्यात आले. प्रवास करताना मद्य घेऊ नये, अशी सूचना दिली. त्यावर त्यांनी पोलिसांचे आभार मानले." - सुनील गिड्डे , सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, मिरज.