ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. ४ - सांगलीतील कवठे एकंद येथे शोभेची दारु बनवणा-या कंपनीत भीषण स्फोट झाल्याने पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
कवठे एकंद येथे शोभेची दारु बनवणा-या अनेक कंपन्या आहेत. यातील ईगल या कंपनीत सोमवारी संध्याकाळी स्फोट झाला. या स्फोटात कंपनीत काम करणा-या पाच कामगारांचा मृत्यू झाला. तर चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. हा स्फोट झाला त्यावेळी कंपनीत सुमारे १० ते १२ कामगार काम करत होते अशी शक्यता वर्तवली जात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतांमध्ये महिला कामगारांचाही समावेश असल्याचे समजते.