विटा : विटा पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ रस्त्याच्या बाजूला लावलेल्या मोटारीची काच फोडून चोरट्यांनी गाडीतील ४ लाख ९१ हजार ४०० रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना आज, बुधवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली. सातारा येथील विजय ट्रेडर्स या होलसेल दारू विक्री एजन्सीच्या सेल्समनने याबाबत फिर्याद दिली आहे. साताऱ्यातील विजय ट्रेडर्समध्ये राहुल उमाकांत चव्हाण सेल्समन आहेत. दि. १६ जूनला त्यांनी पुसेसावळी, मायणी परिसरातून दोन लाख ६३ हजाराची वसुली केली. त्यानंतर जत, भिवघाट, आटपाडी परिसरातील वसुली करून दि. १७ रोजी त्यांनी येथील हॉटेलमध्ये मुक्काम केला. आज सकाळी दहाच्या दरम्यान ते त्याच हॉटेलमधील ५० हजारांची रक्कम घेऊन पोलीस ठाण्यासमोरील दारूच्या दुकानाकडे पैसे वसुलीसाठी आले. त्यावेळी त्यांनी त्यांची मोटार (एमएच ११एडब्ल्यू १०६३) पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ पश्चिमेकडे रस्त्यालगत लावली होती. गाडीचे दरवाजे बंद करून ते दारूच्या दुकानामध्ये गेल्यानंतर चोरट्यांनी चालकाच्या पाठीमागील सीटच्या खिडकीची काच फोडून सीटवर ठेवलेली ४ लाख ९१ हजार ४०० रुपये व धनादेश असलेली बॅग आणि कपड्यांची दुसरी बॅग लंपास केली. तासाभरानंतर चव्हाण गाडीजवळ आल्यानंतर त्यांना काच फोडून रोकड लंपास केल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती त्यांनी तातडीने समोरच असलेल्या पोलीस ठाण्यात दिल्यानंतर नाकाबंदी करण्यात आली. मात्र त्यात यश आले नाही. (प्रतिनिधी)