कोकरुड : चार वर्षांपासून राज्य सरकारने पथदिव्यांसाठी लागणारा निधी सांगली जिल्हा परिषदेस दिला नाही. यामुळे दोन दिवसांपासून निम्मा शिराळा तालुका अंधारात आहे. पुढील दोन दिवसात सर्व ठिकाणची वीज सेवा खंडित केली जाणार असल्याने जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. २०१७-२०१८ पासून आजअखेर ५ कोटी ४५ लाख ९५ हजार ५८३ एवढी मोठी थकबाकी झाली आहे.
तालुक्यातील सर्व गावे डोंगर-दरीत वसली आहेत. तालुक्यातील १५६ गावे आणि वाड्या-वस्त्यांवर महावितरणची वीज पोचली आहे. तालुक्यात पथदिव्यांचे एकूण १८६ कनेक्शनवर तब्बल पंधरा हजारपेक्षा जास्त पोल आहेत. या वीज पुरवठ्यांचे बिलाची रक्कम राज्य सरकारकडून जिल्हा परिषदेमार्फत महावितरणला उपलब्ध करुन दिली जाते. जिल्हा परिषद उपलब्ध झालेल्या निधीतून पथदिव्याचे वीजबिल भागवत असते. मात्र मागील भाजप-शिवसेना सरकारने २०१७-२०१८ पासून जिल्हा परिषदेस निधी दिला नसल्याने शिराळा तालुक्याची आजअखेर ५ कोटी ४५ लाख ९५ हजार ५८३ एवढी मोठी थकबाकी झाली आहे.
या थकबाकीमुळे महावितरणने गेल्या दोन दिवसांपासून शिराळा तालुक्यातील जवळपास शंभर गावांतील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. यामुळे या गावांमध्ये रात्रीच्यावेळी नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. तालुक्यात बिबट्याचे हल्ले वारंवार होत असल्याने रात्री घराबाहेर पडणेही कठीण बनले आहे.
कोट
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात खर्चात कपात करून नागरिकांना सेवा पुरवत आहोत. कर थकबाकी वसुलीत अडचणी येत आहेत. पुन्हा पथदिव्यांचा खर्च ग्रामपंचायतीस परवडणारा नसल्याने शासनाने मार्ग काढावा.
- पोपट ऊर्फ यशवंत पाटील, उपसरपंच कोकरुड.