सांगली : शहरातील कोल्हापूर रस्त्यावरील हॉटेल उदयला गुरुवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. आगीत तीन लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शॉर्टसर्किटने आग लागल्याची शक्यता असून या प्रकरणी हॉटेलचे मालक उदय बडेकर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
गुरुवारी पहाटेच्या सुमारास हॉटेलमधून धूर येत असल्याचे शेजारच्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत तातडीने माहिती दिली. नेमके यावेळी हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर कामगार झाेपले होते. बाहेरचा आवाज ऐकून त्यांना जाग आली. तोवर नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलास फोन करून घटनेची माहिती दिली होती.
अग्निशमन दलाचे जवान पोहोचल्यानंतर त्यांनी तातडीने आग आटोक्यात आणली. आगीत हॉटेलमधील फर्निचर, साहित्याचे एकूण तीन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.