विटा : मोहित्यांचे वडगाव (ता. कडेगाव) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाची सोमवार, दि. ३ व मंगळवार, दि. ४ मे रोजी होणारी यात्रा वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत कोणी पाहुणे व नातेवाइकांना गावात बोलविल्यास त्यांना एक हजार रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय शनिवारी ग्रामदक्षता समितीच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, यात्रा रद्द केल्यामुळे कोणतेही धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार नसल्याचे सरपंच विजय मोहिते यांनी सांगितले.
मोहित्यांचे वडगावचे ग्रामदैवत श्री. भैरवनाथ देवाची यात्रा चैत्र कालाष्टमीला सुरू होते. गेल्या वर्षी कोरोनामुळे यात्रा रद्द झाली होती. या वर्षी ही कोरोनाचे भयंकर संकट आले आहे आहे. दि. ३ व ४ मे रोजी यात्रा होती. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी भैरवनाथ मंदिरात सरपंच विजय मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांचे उपस्थितीत ग्राम दक्षता समितीची बैठक झाली. या बैठकीत सद्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने संचारबंदीसह कडक निर्बंध लावले आहेत. यात्रा, उत्सव रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येथील यात्रा रद्द करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे दंडस्थान, पालखी यासह धार्मिक कार्यक्रम रद्द केले आहेत.
चौकट :
ग्रामदैवत भैरवनाथ देवाची यात्र रद्द झाली असल्याने, यात्रेसाठी कोणीही पाहुणे व नातेवाइकांना आपल्या गावात बोलवू नये. तसे निदर्शनास आले, तर त्यास एक हजार तर गावात कोणी मांस विक्री करीत असल्याचे दिसून आले, तर त्यास ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल, अशी माहिती सरपंच विजय मोहिते यांच्यासह ग्रामदक्षता समितीने दिली.
फोटो : ०२ विटा २
ओळ : श्री भैरवनाथ देव, मोहिते वडगाव.