मिरज : मिरजेत पंढरपूर रस्त्यावरील मगदूम मळ्यात विवाहितेला भेटण्यासाठी आलेल्या मद्यधुंद तरुणाला महिलेच्या पुतण्यासह परिसरातील नागरिकांनी चोप दिला. प्रेमी तरुणाने डोक्यात वीट घातल्याने महिलेचा पुतण्या जखमी झाला. गुरुवारी ही घटना घडली. याबाबत मिरज शहर पोलिसात परस्परविरोधी फिर्याद देण्यात आली असून, दोन्ही गटातील चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मगदूम मळा परिसरातील एका विवाहितेचे सांगलीतील तरुणासोबत काही वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. याची कुणकुण महिलेच्या पतीसह कुटुंबातील नातेवाईकांना लागली होती. महिलेच्या कुटुंबातील सर्वांनी याला विरोध केला. मात्र, विरोध झुगारुन या प्रेमीयुगलाच्या भेटी सुरुच होत्या. गुरुवारी महिला संबंधित तरुणाला भेटण्यासाठी घराबाहेर जाणार होती. मात्र, पतीसह कुटुंबीयांनी याला विरोध केला. तरुणाच्या भेटीसाठी तयारी केलेल्या महिलेने तरुणाला फोन करून कुटुंबीय घराबाहेर सोडत नसल्याची तक्रार केली.
यामुळे तरुणाने मित्रासोबत महिलेच्या घराजवळ येऊन मद्याच्या नशेत जोरदार धिंगाणा घातला. कुटुंबीयांना दमदाटी करत चारचाकी वाहनाच्या काचा फोडल्या. महिलेच्या पुतण्याने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्या डोक्यात वीट मारुन जखमी केले. प्रेमी युगुलाच्या गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणाला वैतागलेल्या परिसरातील नागरिकांनी प्रियकर तरुण व त्याच्या मित्राला चांगलाच चोप दिला. या मारहाणीत प्रेमी तरुणाच्या छातीच्या बरगड्या मोडल्या. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेच्या पुतण्याच्या डोक्यातही दुखापत होऊन चार टाके पडले. याबाबत दोन्ही गटांकडून मिरज शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद देण्यात आली असून, चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.