तासगाव : तासगाव तालुक्यातील सावळज येथे जमिनीच्या वादातून दोन गटांत मारामारी झाली. यात चौघे जखमी झाले असून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. जखमी झालेल्यांमध्ये शशिकांत मलगोंडा पाटील, वेदांत शशिकांत पाटील, सूर्यकांत आलगोंडा पाटील, शंकर देवगोंडा पाटील यांचा समावेश आहे.पोलिसात दिलेल्या तक्रारीत शशिकांत पाटील यांनी म्हटले आहे की, मुलगा वेदांत व सूर्यकांत यांसह ते मंगळवारी ११ वाजण्याच्या सुमारास शेतात काम करण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन गेले होते. यावेळी शंकर देवगोंडा पाटील, विजय शंकर पाटील व कृष्णा शंकर पाटील यांनी आमच्या शेतात यायचे नाही, म्हणत लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर प्रहार केला, तर भांडण सोडविण्यास आलेल्या वेदांत व सूर्यकांत यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत ‘पुन्हा आला तर जिवंत सोडणार नाही,’ असे म्हटले. शंकर देवगोंडा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते त्यांच्या शेतात घाण काढण्यास गेले असता शेजारी असलेल्या शशिकांत पाटील, सूर्यकांत पाटील, वेदांत पाटील यांनी ‘आमच्या शेतात यायचे नाही, ते आमच्या वडिलांच्या नावावर आहे,’ असे म्हणत शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारण्यास गेल्यानंतर त्यांनी डोक्यात, पाठीवर दगड मारून जखमी केले. या प्रकरणी तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस तपास करीत आहेत.
Sangli: जमिनीच्या वादातून सावळज येथे दोन गटात मारामारी, चौघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 13:08 IST