सांगली : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस वाढू लागला आहे. मंगळवारी दिवसभरात नवे १४३ रुग्ण आढळून आले. त्यामुळे आजअखेर कोरोना रुग्णांची संख्या ४९ हजार ९९९ वर पोहोचली आहे. दरम्यान, खानापूर तालुक्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, ४५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ५० हजारांच्या घरात पोहोचली आहे. मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे १४३ नवे रुग्ण आढळून आले. यात सर्वाधिक रुग्ण महापालिका क्षेत्रातील आहेत. सांगलीत १२ व मिरजेत १८ असे ३० रुग्ण शहरातील आहेत. त्याखालोखाल मिरज तालुक्यात २५, जत तालुक्यात २४, तर आटपाडी तालुक्यात १८ रुग्ण आढळून आले. वाळवा तालुक्यात १३, खानापूर ९, तासगाव २, शिराळा ३, कडेगाव १०, पलूस, ५ व कवठेमहांकाळ तालुक्यात ४ रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाला. याशिवाय परजिल्ह्यांतील सोलापूर व मुंबई येथील प्रत्येकी एक व कोल्हापूर येथील दोन असे चार रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत.
दिवसभरात आरटीपीसीआरच्या १२४८ चाचण्यांत १०३, तर अँटिजेनच्या ८९८ चाचण्यांत ४४ जण पाॅझिटिव्ह आले. सध्या ११०० रुग्ण उपचाराखाली असून, त्यातील ७३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे, तर ४५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ९०५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असून, १७३ रुग्णांवर कोविड सेंटरमध्ये उपचार केले जात आहेत.
चौकट
आतापर्यंतचे बाधित : ४९,९९९
कोरोनामुक्त झालेले : ४७,१२३
उपचाराखालील रुग्ण : ११००
आतापर्यंतचे मृत्यू : १७७६