सुरूलच्या पूर्वेला सदाशिव रघुनाथ पाटील यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना तीन बिबट्यांची पिले शेतकऱ्यांना आढळली होती तेव्हा नागरिकांनी ही बछडी पाहण्यासाठी गर्दी केली होती तेव्हा वनक्षेत्रपाल सुशांत काळे, वनपाल अमोल शिंदे, वनरक्षक अधिकारी दीपाली सागावकर, रायना पाटोळे, अमोल साठे, चंद्रकांत देशमुख, अक्षय शिंदे, अनिल पाटील, बाबा गायकवाड, वन्यप्रेमी युनूस मणेर, शहाजी खंडागळे, यांनी ट्रॅप लावून तीन कॅमेऱ्यांद्वारे परिसरावर नियंत्रण ठेवले होते. यावेळी ग्रामसेवक राजेंद्र देवकर, माजी सरपंच संदेश पाटील, पोलीस पाटील माणिक पाटील यांचे सहकार्य लाभले होते.
रात्री बारा वाजता व उशिरापर्यंत एक-एक करून मादीने आळीपाळीने तोंडातून तीनही बछड्यांना उसाच्या फडापासून लांब अंतरावर सुरक्षित ठिकाणी हलविले.
बिबट्याचे वास्तव्य बहुतांशी डोंगराच्या खालील बाजूस असणाऱ्या शेतातून उसाच्या फडात आढळून येत असून त्यांचा जन्मदेखील उसाच्या फडात होण्याच्या घटना घडत आहेत. इथून पुढे शेतकरीवर्गाने शेतात जाताना काळजी घेतली पाहिजे, रात्रीच्या वेळी, एकट्याने जाण्याऐवजी दोन तीन लोकांनी, जवळ बॅटरी, हातात काठी व आवाज करावा जेणेकरून बिबट्या त्या ठिकाणाहून दुसरीकडे जाईल.
- सुशांत काळे. वनक्षेत्रपाल