राजारामनगर येथे ठिबक सिंचन योजनेत सहभागी शेतकऱ्यांचा युवा नेते प्रतीक पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी श्रेणिक कबाडे, सुभाषराव जमदाडे, प्रशांत पाटील, सुजय पाटील, डी. एम. पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : पाणी व रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनीची सुपीकता झपाट्याने कमी होत आहे. पुढच्या पिढीला सुपीक जमीन द्यायची असेल, तर शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन करायला हवे. अन्यथा पुढची पिढी आपणास माफ करणार नाही, असा इशारा युवा नेते प्रतीक पाटील यांनी दिला. शेतात उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरायला हवी, असे आवाहन त्यांनी केले.
राजारामबापू साखर कारखान्याच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘राजारामबापू ठिंबक सिंचन मोहीम-२०३०’ मध्ये सहभागी शेतकऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. शेती समितीचे अध्यक्ष श्रेणिक कबाडे, उपाध्यक्ष सुभाषराव जमदाडे, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, ऊस विकास अधिकारी सुजय पाटील, इरिगेशन ऑफिसर डी. एम. पाटील उपस्थित होते.
पाटील म्हणाले, या योजनेस शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या १०० दिवसांत ५४ शेतकऱ्यांनी ११५ एकरांत ठिबक सिंचन केलेले आहे. आपण मार्च २०२२ पर्यंत ५०० एकरांचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. ते निश्चितपणे पूर्ण करू. या योजनेसाठी पूर्वी १२ टक्के व्याज होते, ते ९ टक्के केलेले आहे. आपण राज्यात सर्वप्रथम शेतावरती ड्रोनद्वारे औषधे फवारणी सुरू केली आहे.
शेती कमिटीचे अध्यक्ष श्रेणिक कबाडे, सुभाषराव जमदाडे यांनी मनोगत व्यक्त केले. सुजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जालिंदर यादव, प्रकाश पाटील, अभिजित पाटील, हिंदुराव पाटील, हणमंत डोंगरे, शंकर पाटील, कलगोंडा पाटील, रामचंद्र पाटील, धनाजी थोरात, सुरेंद्र चौगुले उपस्थित होते. प्रशांत पाटील यांनी आभार मानले.