वांगी : राज्यात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या राज्यकर्त्यांनी घडवून आणलेल्या हत्याच आहेत. राज्यातील शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरविण्याचे काम राज्यकर्ते करीत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी केला. वांगी (ता. कडेगाव) येथील शेतकरी संघटनेच्या जनप्रबोधन यात्रा सभेत ते बोलत होते.
रघुनाथ पाटील म्हणाले, आमच्या शेतीमालाचे पैसे शासनाकडूनच येणे आहेत. त्यामुळे शेतकरी कोणतेही कर्ज भरणार नाही. शेतकऱ्यांना दिवसा व योग्य दाबाने शेतीपंपास वीज मिळाली पाहिजे. शेतकरी लुटीचे कायदे रद्द करावेत. शासनाने शेतकऱ्यांना सर्व कर्जातून व वीज बिलातून मुक्त करावे. दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करावी. बाजाराचे व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य द्यावे. शेतकऱ्यांच्या गाईच्या दुधाला ४० रुपये व म्हशीच्या दुधाला ६० रुपये भाव द्यावा व उसाला प्रतिटन ४ हजार रुपये भाव मिळालाच पाहिजे. या आमच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यकर्त्यांना बाहेर फिरू न देण्यासाठी आंदोलन हाती घेणार, असे ते म्हणाले.
क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे राज्य अध्यक्ष शिवाजीराव नांदखीले, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, जिल्हाध्यक्ष हणमंत पाटील, कडेगाव तालुका अध्यक्ष परशुराम माळी यांची भाषणे झाली.
यावेळी भाऊसाहेब पवार, शिवाजी राजमाने, रामचंद्र जंगम, विलास कदम, सर्जेराव थोरात, गणेश गायकवाड, विजय माळी, अभिजित कांबळे व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
फोटो-०३वांगी०१