लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कडक लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या दोन दिवसांत झालेली कडक तपासणी आता बंद झाली आहे. पोलिसांची लोकांकडील नजर हटताच शहरातील लोकांची वर्दळ वाढली आहे. अकारण भटकंती करणाऱ्यांची संख्या यात अधिक आहे.
सांगली शहरात माधवनगर जकात नाका, काॅलेज कार्नर, कर्मवीर भाऊराव पाटील चौक, पटेल चौक, स्टेशन चौक, एसटी स्टँड, कोल्हापूर रोड, विश्रामबाग चौक याठिकाणी पोलिसांनी बॅरिकेट्स लावून तपासणी नाके केले आहेत. मात्र, हे नाके आता पोलिसांचे विश्रांती नाके बनले आहेत. बुधवारी शहरातील एकाही नाक्यावर तपासणी होत नव्हती. त्यामुळे अनेक चारचाकी व दुचाकी वाहने रस्त्यावर आली. दिवसभर नागरिकांची वर्दळ वाढली होती.
कडक लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या दोन दिवसांत पोलीस प्रमुखांनी मोठी कारवाई केल्याने सर्व ठिकाणी बंदोबस्तातील पोलीस अलर्ट झाले. पोलीस प्रमुखांचे दुर्लक्ष होताच पोलिसांची तपासणीत ढिलाई सुरू झाली. त्याचा गैरफायदा घेत लोक रस्त्यावर फिरू लागले आहेत. तरुण मुलेही भरधाव वेगाने दुचाकी फिरविताना दिसत आहेत. अत्यावश्यक वाहनांसह अन्य वाहनेही मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर दिसत आहेत. त्यांची कोणीही तपासणी करीत नाहीत.
चौकट
संचारबंदीची व्याख्या बदलली
संचारबंदीच्या काळात मुक्त संचार करता येतो, हे सांगलीकरांनी दाखवून दिले आहे. संचारबंदीची व्याख्याच बदलली, नव्या व्याख्येप्रमाणे संसर्गाला निमंत्रण देत नागरिकांचा पोलिसांसमोर मुक्त संचार सुरू आहे.
चौकट
गृहविलगीकरणातील लोक रस्त्यावर
गृहविलगीकरणातील लोक आता रस्त्यावर फिरत आहेत. माधवनगर, शिवोदयनगर येथील काही रुग्ण मंगळवारी रात्री रस्त्यावरून फिरत होते. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. रस्त्यावरून फिरणारे, गृह विलगीकरणातील रुग्ण अशा कोणावरही प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष नसल्याचे दिसत आहे.