आष्टा : मराठा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य व हिरकणी ग्रुप आष्टा यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष संवर्धन व संरक्षणासाठी आष्टा येथे ‘भगिनी रक्षणम्’ हे प्रबोधनपर अभिनव राबविण्यात आले.
सध्याच्या काळात वृक्ष संवर्धनाची गरज लक्षात घेऊन प्रत्येकाने निसर्गाची रक्षा करून वृक्षारोपण केले तर आपला देश हरितमय होऊन पर्यावरणाचे उत्तम संतुलन राखण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मराठा ऑर्गनायझेशनचे संपर्कप्रमुख अजय शिंदे यांनी केले.
हिरकणी ग्रुप आष्टाच्या भगिनींनी नैसर्गिक साहित्यापासून बनवलेल्या राख्या मराठा ऑर्गनायझेशनच्या भावांना बांधली व भावांकडून बहिणीला एक वृक्ष भेट देऊन पर्यावरण संरक्षणाचे वचन दिले.
यावेळी हिरकणी ग्रुप आष्टाच्या संस्थापिका सुनीता घोरपडे, मराठा ऑर्गनायझेशनचे सदस्य श्रेयस शिराळकर, शंकर आराकळे, यश मेंगाने, आकाश माळी, राजवर्धन थोरात, नीलेश पाटील, हिरकणी ग्रुपच्या सदस्या वैशाली डफळे, प्रा. डॉ. मीना सुर्वे, वर्षा देसावले आदी उपस्थित होते.
श्रद्धा लांडे यांनी आभार मानले.