इस्लामपूर : इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनतर्फे राज्यातील सर्व नगरपालिकांमधील पाणीपुरवठा व्यवस्थापनात इस्लामपूर पालिकेच्या पाणी योजनेस उत्कृष्ट पाणी पुरवठा व्यवस्थापनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याची माहिती मुख्याधिकारी नीलेश देशमुख, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांनी दिली. पुणे येथील कार्यक़्रमात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे माजी सदस्य सचिव पटवर्धन यांच्याहस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, पाणी पुरवठा सभापती सौ. छाया देसाई, अभियंता आर. आर. खांबे, मोहन माळी यांनी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र स्वीकारले. पाणी परिषदेचे अध्यक्ष बी. डी. यमगर अध्यक्षस्थानी होते.देशमुख म्हणाले, नगरपालिकांची पाहणी करण्यासाठी तज्ज्ञ अभियंत्यांचे सहा गट तयार करुन ही तपासणी झाली. के. एन. पाटे यांनी पुणे विभागातील पाणी योजनेच्या व्यवस्थापनांचे गुणांकन केले. त्यामध्ये पालिकेची पाणी योजना प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. आधुनिक तंत्रज्ञान, स्वच्छता, आर्थिक व्यवस्थापन, मीटरद्वारे पाणी पुरवठा, जलशुध्दीकरण केंद्राचे स्वयंचलित कामकाज या सर्व बाबी पुरस्कारासाठी महत्त्वाच्या ठरल्या.यावेळी पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील, शंकरराव चव्हाण, अशोक इदाते, विजय कोळेकर, आनंद कांबळे उपस्थित होते. (वार्ताहर)उपनगराध्यक्ष संतापले..! पत्रकार परिषदेला सुरुवात होण्यापूर्वीच आक्रमक पवित्र्यात आलेल्या उपनगराध्यक्ष संजय कोरे यांनी दारातूनच संताप व्यक्त केला. ‘अडचणीचे प्रश्न आम्ही सोडवायचे, त्यासाठी मला व खंडेराव जाधव यांना पुढे करायचे. मोठेपणा असला की तुम्ही पुढे व्हायचे’, असे बोल सुनावून फणकारत ते निघून गेले.
इस्लामपूरच्या पाणी योजनेस ‘उत्कृष्ट व्यवस्थापन’ पुरस्कार
By admin | Updated: July 27, 2015 00:31 IST