महालिंग सलगरकुपवाड : मिरज, कुपवाड एमआयडीसीसह लगतच्या औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांना सध्या कामगारांचा तुटवडा जाणवू लागला आहे. होळीनंतर एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यांमध्ये उद्योजकांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे. या तुटवड्याचा उद्योगामधील उत्पादनावर गंभीर परिणाम होणार असून, एमआयडीसीतील या अडचणीतील उद्योगाची चाके पुन्हा रूळावर येण्यासाठी उद्योजकांना जून महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. महापालिका क्षेत्रालगत असलेल्या मिरज एमआयडीसी, कुपवाड एमआयडीसी, वसंतदादा औद्योगिक वसाहत, संजय इंडस्ट्रीयल इस्टेट, गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहत या औद्योगिक क्षेत्रामधील इंजिनिअरींग, फौंड्रीसह इतर प्रकारच्या उद्योगामध्ये स्थानिकाबरोबरच परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात काम करतात. या एमआयडीसीमधील उद्योगामध्ये काम करणारे परप्रांतीय कामगार मार्च महिन्याच्या प्रारंभी होळी सणासाठी त्यांच्या राज्यात जातात. त्यानंतर जिल्ह्यासह लगतच्या स्थानिक गावामधील कामगार उन्हाळी सुट्ट्या, यात्रा, उरूस, लगीनसराई आदी कारणामुळे कामावर येण्यास सतत टाळाटाळ करतात.स्थानिक कामगारांच्या मुलांना उन्हाळी सुट्ट्या पडतात. एप्रिल, मे महिने लग्नसराईचे दिवस असतात. गावोगावी उरूस आणि यात्रांचा हंगाम असतो. त्यामुळे मुलांच्याबरोबर कामगार असलेले स्थानिक पालकही कामाला दांडी मारून फिरायला जातात. स्थानिक कामगार आठ ते पंधरा दिवसांसाठी कामावर दांडी मारतात. तर परप्रांतीय कामगार दोन महिने कामावर येत नाहीत. अन्यथा जादा पगार मिळाल्यास होळीनंतर दुसऱ्या ठिकाणी जाऊन काम करतात.
जून महिन्याची वाट पाहावी लागणार !सध्या मार्च महिना अडचणीचा जात आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्याचा हा कालावधीही एकप्रकारे उद्योजकांच्यासाठी अडचणीचा ठरणार आहे. या तुटवड्याचा उद्योगामधील उत्पादनावर गंभीर परिणाम होत आहे. एमआयडीसीतील या उद्योगांची चाके पुन्हा रूळावर येण्यासाठी उद्योजकांना जून महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.
मार्च महिन्याच्या प्रारंभी परप्रांतीय कामगार होळी सणासाठी गावाकडे जातात. स्थानिक कामगार जत्रा, उन्हाळी सुट्टया, लगीनसराई आदी कारणामुळे कामावर येत नाहीत. या कालावधीत कामावर असणाऱ्या कामगारामध्येच नियोजन करून कामे पूर्ण करावी लागत आहेत. मार्चनंतर एप्रिल व मे या महिन्यामध्ये उत्पादनावर परिणाम होणार आहे. - अनंत चिमड, अध्यक्ष, बामणोली इंडस्ट्रियल असोसिएशन.