आष्टा-वडगाव रस्त्यावरील ११ केव्ही वाहिनीवरील असणाऱ्या केबलच्या वायर्स.
लोकमत न्यूज नेटवर्क
बागणी : खासगी दूरचित्रवाहिन्यांच्या केबलचे महावितरणच्या खांबावरील अतिक्रमण वीज दुरुस्ती करणाऱ्या वायरमनला अडचणीचे ठरू लागले आहे.
आष्टा, बागणी परिसरात कोणत्याही रस्त्याने प्रवास करताना रस्त्याकडेला असलेल्या महावितरणच्या वीज वाहिनीच्या खांबांवर नजर टाकल्यास सहज लक्षात येते की, खासगी केबल वाहिनी टाकण्यासाठी महावितरणच्या साध्या खांबापासून ते ११ केव्ही वीज वाहिनीच्या खांबांचा सर्रासपणे वापर केलेला दिसत आहे. ही बाब डोळ्यांनी पाहण्याशिवाय महावितरणचे अधिकारी कोणतीच कारवाई करताना दिसत नाहीत.
पूर्वी खासगी केबलसाठी स्वतंत्र खांब तसेच शेतातील झाडांचा वापर केला जायचा. परंतु ऊस वाहतुकीवेळी केबलच्या वायर खाली असल्याने वारंवार तुटत. त्यावेळी शेतकरी व केबलचालक यांच्यात वादावादीचे प्रकार घडत होते. काहीवेळा शेतकऱ्यांना जबरदस्तीची नुकसानभरपाई सोसावी लागत असत. या सर्व प्रकारांवर तोडगा म्हणून केबलचालकांनी आपला मोर्चा महावितरणच्या पोलकडे वळवला. उंच शिड्या आणून जीव धोक्यात घालून विजेच्या तारांबरोबर केबलच्या वायर बांधण्याचे प्रकार सुरू केले. आता हा प्रकार सर्रास सुरू आहे. ताे थांबविण्याची गरज आहे. कारण महावितरणच्या वीज कर्मचाऱ्याला खांबावर विजेची दुरुस्ती करताना अडचणी येत आहेत. खांबावर काम करताना खांबावरील वायरमध्ये पाय अडकून अपघात होण्याची भीती व्यक्त हाेत आहे.