सांगली : महापालिकेचे कर्मचारी दोन महिन्यांच्या वेतनापासून वंचित आहेत. त्यात आता जानेवारी महिनाही संपत आला आहे. तरीही अद्याप वर्ग एक ते तीनच्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. त्यात बँकांची कर्जे, विम्याचे हप्ते थकल्याने दंडाचा भुर्दंडही सहन करावा लागणार आहे. एलबीटीमुळे पालिकेची आर्थिक स्थिती ढासळली आहे. घरपट्टी, पाणीपट्टीच्या तुटपुंज्या करावर पालिकेला दैनंदिन खर्च भागवावा लागत आहे. गेल्या नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांचे वेतन अद्यापही कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही. पालिकेकडून एलबीटी, घरपट्टी, पाणीपट्टी व इतर करातून खर्च भागवून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जात आहे. तेही महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या हाती पडते. पण वर्ग एक ते तीनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी दोन ते तीन महिने थांबावे लागत आहे. जानेवारी महिनाही संपत आला तरी, दोन महिन्यांचे वेतन कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही. कर्मचाऱ्यांनी वेतनावर बँका, सोसायट्यांची कर्जे घेतली आहेत. शिवाय विमाही उतरविला आहे. वेतन वेळेवर होत नसल्याने त्याच्या दंड, व्याजाचा भुर्दंड कर्मचाऱ्यांवर पडत आहे. (प्रतिनिधी)
कर्मचारी पगारापासून वंचित
By admin | Updated: January 28, 2015 00:52 IST