सांगली : जिल्ह्यातील कोरोनाचा कहर काही केल्या कमी होताना दिसून येत नाही. राज्यात एकीकडे रुग्णसंख्या ओसरत असताना जिल्ह्यात बाधितांची संख्या कायम आहे. या पार्श्वभूमीवर नॉन कोविड रुग्णांवरील उपचारांत अडचणी येत आहेत. कोरोना संसर्गामुळे बंद असलेल्या शासकीय रुग्णालयातील नियमित शस्त्रक्रिया विभाग बंदच असून, केवळ अत्यावश्यक शस्त्रक्रियाच केल्या जात आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अद्यापही कायम असल्याने नियमित शस्त्रक्रिया सुरु करण्यासाठी ही लाट ओसरण्याची प्रशासनाला प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी कोरोना संसर्ग वाढू लागताच तातडीने सांगली व मिरज शासकीय रुग्णालयांत उपचारांचे नियोजन करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाने मिरज रुग्णालयाला कोविड रुग्णालयाचा दर्जा दिला तर सांगलीमध्ये ‘नॉन कोविड’ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
कोरोनामुळे सांगली रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागही बंद करण्यात आला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्येही आरोग्य यंत्रणेवर असलेला ताण लक्षात घेऊन शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सध्या नियमित शस्त्रक्रिया बंद आहेत.
सध्या जिल्ह्यात सरासरी हजारावर कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. यातील चिंताजनक बाब म्हणजे रुग्णसंख्या कमी हाेण्याऐवजी वाढत आहे किंवा स्थिर राहात आहे. त्यामुळे नॉन कोविड रुग्णांवरील उपचारांचे नियोजन करताना प्रशासनाला अडचणी येत आहेत. तरीही सांगलीत नियमित बाह्यरुग्ण विभाग सुरु करून रुग्णांना दिलासा दिला आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होताच नियमित शस्त्रक्रिया सुरु करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.
चौकट
सांगलीत अत्यावश्यक शस्त्रक्रिया सुरु
१) दीड वर्षापूर्वी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर उपचारासाठी नियमित शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या होत्या.
२) नोव्हेंबरमध्ये कोरोना नियंत्रणात आल्यानंतर काही विभाग नियमित सुरु झाले होते.
३) कोरोनाची दुसरी लाट अद्यापही जिल्ह्यात कायम असल्याने नियमित विभाग बंद करुन केवळ अत्यावश्यक शस्त्रक्रियाच सुरु ठेवण्यात आल्या आहेत.
चौकट
बाह्यरुग्ण विभाग झाला नियमित सुरु
* कोविड रुग्णांवरील उपचारातच आरोग्य यंत्रणा व्यस्त असल्याने मध्यंतरी उपचाराला अडचणी होत्या.
* नॉन कोविड रुग्णांचेही हाल होऊ नयेत व त्यांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी ओपीडी सुरू करण्यात आली आहे.
* बाह्यरुग्ण विभाग सुरू केल्याने रुग्णालयातील गर्दी वाढली असून, सरासरी तीनशेहून अधिक रुग्णांची दररोज तपासणी होत आहे.
चौकट
गोरगरिबांसाठी सांगलीच आधार
* कोरोना अद्यापही कायम असला तरी कोरोना व्यतिरिक्तच्या उपचारासाठीही प्राधान्य देण्यात आले आहे.
* यामुळे मिरजेत कोविड रुग्णांवर तर सांगलीतील शासकीय रुग्णालयात नॉन कोविड रुग्णांवर उपचार होत असल्याने सांगली रुग्णालय गोरगरिबांसाठी आधार ठरले आहे.
* कोरोना आटोक्यात आल्यानंतर तातडीने नियमित शस्त्रक्रिया सुरु करण्याची मागणी होत आहे.
कोट
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्यानंतर नियमित शस्त्रक्रिया विभाग बंद ठेवण्यात आला होता. तरीही अत्यावश्यक असलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रियांचे नियोजन करण्यात येत आहे. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर लवकरच नियमित शस्त्रक्रिया सुरू करण्यात येतील.
- डॉ. नंदकिशोर गायकवाड, अधीक्षक, शासकीय रुग्णालय, सांगली.