आष्टा : आष्टा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकपदाची निवड मंगळवार, दि. ६ रोजी होत आहे. उपनगराध्यक्षपदी शिंदे गटाचे शेरनवाब देवळे व स्वीकृत नगरसेवक म्हणून जलसंपदामंत्री जयंत पाटील गटाचे धैर्यशील थोरात यांची निवड निश्चित मानली जात आहे.
आष्टा पालिकेत माजी आमदार दिवंगत विलासराव शिंदे व जलसंपदा मंत्री जयंत पाटील गटाची सत्ता आहे. दुसऱ्या व चौथ्या वर्षी जयंत पाटील गटाच्या नगरसेवकांना उपनगराध्यक्ष पदाची संधी देण्यात येते. पाचव्या वर्षी शिंदे गटाला संधी देण्यात आली. शिंदे गटाच्या प्रतिभा पेटारे यांना काही काळ संधी दिल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. या ठिकाणी शेरनवाब देवळे, धैर्यशील शिंदे, शारदा खोत यांची नावे चर्चेत होती. मात्र, आष्टा शहर विकास आघाडीने ज्येष्ठ नगरसेवक शेरनवाब देवळे यांच्या पारड्यात वजन टाकल्याने त्यांची निवड निश्चित आहे. जयंत पाटील गटाचे स्वीकृत नगरसेवक विकास बोरकर यांनी राजीनामा दिल्याने या ठिकाणी इच्छुकांची संख्या जास्त होती. मात्र, मंत्री पाटील यांनीच धैर्यशील थोरात यांना शब्द दिल्याने थोरात यांच्या गळ्यात स्वीकृत नगरसेवक पदाची माळ पडणार आहे.
या निवडी मंगळवारी दुपारी १ वाजता होत आहेत. यावेळी नगराध्यक्षा स्नेहा माळी पीठासन अधिकारी आहेत. मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्यासह सर्व नगरसेवक ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत.