सांगली : संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात पसरत आहे. असे वातावरण असताना निवडणूक आयोगाने कोणत्याही निवडणुका घेणे चुकीचे होते. ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या आहेत तिथे कोरोनाचे गंभीर दुष्परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे निवडणुकांचे नियोजन करताना निवडणूक आयोगाने तारतम्य बाळगणे आवश्यक होते अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली.
महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी जयंत पाटील म्हणाले, देशात कोरोनाची लाट वेगाने वाढत आहे. संसर्ग टाळण्यासाठी देशभरात कोणत्याही निवडणुका घेणे उचित नव्हते. मात्र, निवडणूक आयोगाने देशभरात निवडणुका घेतल्या. निवडणूक आयोगाने जरा तारतम्य बाळगले असते, तर परिस्थिती गंभीर बनली नसती. ज्या राज्यात निवडणुका झाल्या तिथे कोरोनाचे परिमाण दिसून येत आहेत.
राज्यात कोरोना नियंत्रणासाठी राज्य शासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करीत आहे. आता जनतेनेही निर्बंध पाळले पाहिजेत. पोलिसी खाक्या दाखवून कोणालाही बंधनात ठेवायचे नाही. मात्र, नियम न पाळता कोणी रस्त्यावर आला तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल, असेही पालकमंत्री पाटील म्हणाले.
चौकट
रेमडेसिविर काळाबाजाराची चौकशी करणार
रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजारप्रकरणी पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेतली आहे. पोलिसांनी याआधी दोघांना अटक केली आहे या प्रकरणात आणखी कोणीही दोषी आढळला तरी त्याच्यावर ही कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.