आटपाडी : राज्य शासनाने ऑक्टोबर २०१८ मध्ये दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे इयता दहावीचे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता. अडीच वर्षे झाली तरी आटपाडी तालुक्यातील विद्यार्थ्यांना अजून शुल्क परत मिळालेले नाही. आता पुन्हा आधारकार्ड आणि बँकेची माहिती मागवून परीक्षा मंडळाने दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची क्रूर चेष्टा केली आहे.
शासनाने आटपाडी तालुक्यात २०१८ मध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला होता. त्यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार दुष्काळ जाहीर करण्याऐवजी नेहमी टंचाईसदृश स्थिती जाहीर करत होते, पण तत्कालीन भाजप-शिवसेना युतीच्या शासनाने थेट दुष्काळ असा शब्द वापरून आदेश काढला होता. जून ते सप्टेंबर या कालावधीतील पावसाची तूट, भूजलाची कमतरता, वनस्पती निर्देशांक, मृदु आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र आणि पीक परिस्थिती या सर्वांचा एकत्रित विचार करून आटपाडी तालुक्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला होता. शासनाने दि. ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी राज्यातील दुष्काळी तालुक्यांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यात आटपाडी तालुक्याचा समावेश होता. शासनाने त्यावेळी निर्णय घेतला की, दुष्काळ घोषित केल्याचा आदेश दि. ३१ ऑक्टोबर२०१८ पासून अंमलात येतील. शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ केली जाईल. आणखीही काही सवलती त्यावेळी जाहीर केल्या होत्या. परीक्षा शुल्कात माफी हा आदेशातील पाचवा मुद्दा होता. आजअखेर तालुक्यातील एकाही विद्यार्थ्याला पैसे परत मिळालेले नाहीत. आता ते सर्व विद्यार्थी बारावीच्या परीक्षेच्या घोळात सापडले आहेत. त्यात शाळा दूरध्वनीवरून त्यांना दहावीच्या परीक्षेच्या शुल्क माफीसाठी माहिती देण्यासाठी संपर्क साधत आहेत.
चौकट
दुष्काळी भागाला १५ लाखांचा गंडा !
शासनाने शुल्कमाफीचा आदेश दि. ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी काढला. त्यानंतर दि. ६ नोव्हेंबरपासून इयता दहावीचे परीक्षा अर्ज भरण्यात आले. प्रत्येकी ३२५ रुपये असे तालुक्यातील ४५३२ विद्यार्थ्यांनी एकूण १४ लाख ७२ हजार ९०० रुपये नुसती परीक्षा मंडळाला फी भरली. अर्थात शाळांनी अजून झेरॉक्स आणि इतर खर्चाच्या नावाखाली १०० ते२०० रुपये प्रत्येक पालकांकडून उकळले. शासन निर्णयानंतर शुल्क घेण्याची गरजच नव्हती. त्यावेळी एकदा घेऊन आता पुन्हा सध्या शाळा विद्यार्थी किंवा पालकांचे आधारकार्ड आणि बँकेचा तपशील फी परत देण्यासाठी मागत आहे.
कोट
परीक्षा मंडळाने शाळा व्यवस्थापनाला विद्यार्थी किंवा पालकाचे आधारकार्ड आणि बँक खात्याच्या माहितीचा तपशील ऑनलाईन भरण्यास सांगितले आहे. लवकरच थेट त्यांच्या बँक खात्यात परीक्षा शुल्काची रक्कम जमा होईल.
-दतात्रय मोरे, गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, आटपाडी.