सांगली : जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती. जिल्ह्यातील जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ या दुष्काळी तालुक्यांना या पावसाने दिलासा मिळाला आहे. पावसाची रिमझिम चालूच असली, तरी विटा येथे वीज कोसळून एक तरुण ठार झाला, तर कवठेमहांकाळ तालुक्यातील निमज येथे दरड कोसळून महिला ठार झाली. सांगली शहरात दुपारी दोन वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. दिवसभर रिपरिप सुरूच होती. शनिवारपासून शहरात पावसाचा मुक्काम आहे. दोन दिवसांच्या पावसाने शहराच्या गुंठेवारीसह विस्तारित भागात दलदल निर्माण झाली होती. संजयनगर येथे अनेक घरांमध्ये पावसाचे व साचलेले सांडपाणी घुसल्याने नागरिकांची पळापळ झाली. दुसरीकडे जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला हस्त नक्षत्राच्या या पावसाने मोठा दिलासा दिला. विटा येथे रविवारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाला जोरात सुरुवात झाली. जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, कडेगाव, पलूस, मिरज पूर्व अशा सर्वच ठिकाणी पाऊस झाला. शिराळा तालुक्यातील मांगले, सागाव येथे दुपारी मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. शिराळा शहरासह चांदोली धरण परिसर, कोकरूड उत्तर भागात पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी दिवसभर ढगांची दाटी होती. (प्रतिनिधी)जनावरे चारायला गेला अन्...शेतात जनावरांना चरण्यास घेऊन गेलेल्या दादासाहेब आबा पवार (वय ३२, रा. सुळेवाडी-विटा) या तरुणाच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी पावणेएक वाजण्याच्या सुमारास विटा-सुळेवाडी येथील आंबा टाका दरीजवळील लोहार टाका शेतात घडली. तसेच कवठेमहांकाळ तालुक्यातील निमज येथे मेंढ्यांना चरण्यास घेऊन गेलेल्या आक्काताई श्रीमंत रूपनर (४५, रा. निमज) यांचा डोंगराची दरड कोसळून जागीच मृत्यू झाला.
दुष्काळी भागालाही दिलासा
By admin | Updated: October 5, 2015 01:10 IST