सांगलीत स्वातंत्र्यदिनी राबविलेल्या मोहिमेत साडेसहा टन ई-कचरा संकलित झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत विविध स्वयंसेवी संस्थांनी स्वातंत्र्यदिनी राबविलेल्या मोहिमेत तब्बल साडेसहा टन ई कचरा संकलित झाला. सुमारे डझनभर भंगार टीव्ही, १०० हून अधिक बंद मोबाईल संच यासह वायर, संगणक मॉनिटर्स, सीपीयू, विजेची बंद उपकरणे असा नानातऱ्हेचा इलेक्ट्रॉनिक व विद्युत कचरा कार्यकर्त्यांनी गोळा केला.
सांगलीत पाच टन, इचलकरंजीत साडेचारशे किलो, तासगाव, इस्लामपूर, पलूसमध्ये १२०० किलो ई-कचरा गोळा झाला. ४४ केंद्रांवर संकलन झाले. हा ई-कचरा १६ घंटागाड्यांमधून जमा करण्यात आला. प्रत्येक व्यक्तीने दिलेल्या ई-कचऱ्याची नोंद करण्यात आली. दीड हजार लोकांनी टाकाऊ साहित्य दिले. तसे प्रमाणपत्रही त्यांना देण्यात आले.
जीवन विद्या मिशन, रॉबिनहूड आर्मी, निसर्ग संवाद, आभाळमाया, नेचर काॅन्झर्व्हेशन सोसायटी आदी संस्थांनी उपक्रम राबवला. प्रमोद चौगुले, डॉ. मनोज पाटील, प्रशांत मजलेकर, डॉ. दिलीप पटवर्धन, राजेंद्र जोशी आदींच्या मार्गदर्शनाखाली रोहन कोठारी, सौरभ मराठे, प्रदीप कुलकर्णी, प्रा. डॉ. शर्वरी सोलापुरे, प्रणिता हेरवाडे, डॉ. भाग्यश्री वाटवे, हिमांशू लेले, श्रीपाद कुलकर्णी, सुधीर गोरे, शैलेश पाटील, डॉ. अनिल जाधव, डॉ. ऋतुराज पाटील, अमित कुंभार, राजेश व्यास, दिलीप जोगळेकर, शंतनू जोगळेकर, विलास भिसे, आशिष किंकर, महेश सुतार आदींनी उपक्रमात भाग घेतला.
चौकट
हे झाले गोळा
रेडिओ, टेप, स्पीकर, माईक, लॅण्डलाईन दूरध्वनी, मोबाईल, सेट टॉप बॉक्स, सीडी, डीव्हीडी, कॅसेट टेप, पेन ड्राईव्ह, हार्डडिस्क, संगणक, शोभेच्या वस्तू, खेळणी, हेअर ड्रायर, शेविंग मशीन, डिजिटल घड्याळे, कॅल्क्युलेटर, दिव्यांच्या माळा, आयपॉड, चार्जर, एलईडी दिवे, वजनकाटे, कॅमेरा, इस्त्री, प्रिंटर, एअर प्युरिफायर, म्युझिक सिस्टीम अशा नाना तऱ्हेच्या वस्तू गोळा झाल्या.
चौकट
जमा केलेल्या ई-कचऱ्याचे काय होणार?
सुस्थितीतील साहित्य गरजू विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. दुरुस्ती शक्य असलेले साहित्य दिव्यांगांकडे दुरुस्तीसाठी दिले जाईल. पूर्णत: निरुपयोगी साहित्य शास्त्रीय पद्धतीने नष्ट केले जाणार आहे. हे सर्व काम पूर्णम इकोविजन फाऊंडेशन या अनुभवी संस्थेमार्फत होईल. भविष्यात पूर्णमच्या मार्गदर्शनाखाली अशा मोहिमा पुन्हा राबविल्या जाणार आहेत.