सांगली : महापालिकेच्या आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी ४५ वर्षांवरील नागरिक गर्दी करत आहेत. लसीच्या उपलब्धतेनुसार नागरिकांना केंद्रावर बोलविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये. तसेच १८ वर्षांपुढील लोकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून अपॉइंटमेंट निश्चित करावी, असे आवाहनही मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.
--------
लसीसाठी अडीच हजार जणांची नोंदणी
सांगली : महापालिका क्षेत्रातील १८ ते ४४ वयोगटातील २४०० जणांनी लसीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. महापालिकेच्या जामवाडी व समतानगर या दोन केंद्रांवर त्यांच्या लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. दररोज ४०० जणांचे लसीकरण करण्याचे नियोजन आहे. तरुणांनी लसीकरणाबाबत उत्साह दाखविला आहे.
----------------
यड्रावमधील ऑक्सिजन प्लांटचा वापर करावा
सांगली : जिल्ह्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत आहे. यड्राव येथे ऑक्सिजन लिक्विड प्लांट सध्या रिकामा आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने हा प्लांट जिल्ह्यातील ऑक्सिजनची साठवणूक करण्यासाठी वापर करावा, अशी मागणी सतीश साखळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
---------
धान्य दुकानदारांना लस द्या
सांगली : रेशनिंग दुकानात काम करणाऱ्या लोकांनाही कोरोना प्रतिबंध लस द्यावी, अशी मागणी नगरसेविका सोनाली सागरे यांनी आयुक्तांकडे केली. सध्या स्वस्त धान्य दुकानातून गोरगरिबांना धान्याचे वाटप होणार आहे. या दुकानात १८ वर्षांवरील तरुण काम करतात. त्यांना लस देण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या.