फोटो ओळ : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे सुयश पाटील यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना शैक्षणिक फी संदर्भात निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरळप : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने गेल्या वर्षभरात शाळा व महाविद्यालये बंद आहेत. तरीही शैक्षणिक संस्था व महाविद्यालयाकडून फीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून सक्तीने वसुली केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने संस्थेने फी वसुली न करण्याचे निर्देश देऊनही विद्यार्थी व पालकांची होणारी लूट सुरु आहे. ती थांबवावी अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुयश पाटील यांनी दिला. याबाबतचे निवेदन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की कोरोनामुळे सध्या सर्वांवर आर्थिक संकट ओढावले आहे. अशा स्थितीत शैक्षणिक संस्थांनी सहकार्य करण्याची गरज आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शैक्षणिक संस्थांनी शैक्षणिक शुल्कात कपात करावी. विद्यार्थी वापरत नसलेल्या सुविधांचे शुल्क संस्थांनी आकारू नये. मागील वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक फी दिली नाही व यंदा आर्थिक संकटामुळे फी भरण्यास जे असमर्थ ठरले आहेत त्यांना शैक्षणिक वर्षात शिक्षणापासून वंचित ठेवू नये. तसेच विद्यार्थ्यांना शाळेतूनच शैक्षणिक साहित्य घेण्याची सक्ती करू नये या मागण्यांबाबत शैक्षणिक संस्थांनी गांभीर्याने विचार केला नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने दिला आहे.
यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुयश पाटील यांच्यासह संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.