लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील प्रकाश हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचा निषेध करीत डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाची सुरुवात केली. जोपर्यंत हे खोटे गुन्हे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुुरू राहणार आहे, असे कामगार संघटनेचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सांगितले.
येथील सांगली रस्त्यावरील प्रकाश शैक्षणिक संकुलातील प्रकाश हॉस्पिटलच्या आवारात डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनावर दबाव आणणाऱ्या मंत्र्यांचा निषेध करण्यात आला. कामगार संघटनेचे अध्यक्ष अभिजित पाटील, डॉ. धैर्यशील पाटील, विश्वजित गिरीगोसावी, डॉ. राहुल नाकील, शिल्पा पेडनेकर, राणी पाटील यांनी या घटनेचा निषेध नोंदवला.
अभिजित पाटील म्हणाले, हा खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी ज्याने फिर्याद दिली आहे. त्याचा मृताशी काहीही संबंध नाही. रुग्ण हॉस्पिटलमध्ये असेपर्यंत पोलिसांत फिर्याद देणारी व्यक्ती इकडे कधीही फिरकली नव्हती. उपचाराचे शासकीय लेखापरीक्षकांकडून तपासणी झालेले बिल पूर्णपणे भरले आहे. तहसीलदार रवींद्र सबनीसही यावेळी उपस्थित होते. कोणत्याही प्रकारची जातीवाचक शिवीगाळ झालेली नसतानाही अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल केला जातो, हे गंभीर आहे. पोलीस आणि महसूल प्रशासन कोणाच्या दबवाखाली काम करीत आहे, हे जनतेला माहिती झाले आहे. गुन्हे मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा हॉस्पिटलच्या कार्यस्थळावर आला होता.