सांगली : जिल्ह्यातील डाळिंब बागांमधील कीड नियंत्रणात आणण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने तेथील बागांचे सर्वेक्षण, संशोधन करण्यास मंजुरी दिली आहे. सात हजार ४०० हेक्टर क्षेत्रावरील डाळिंब बागांचे १ सप्टेंबरपासून सर्वेक्षण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, कीडरोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्पामध्ये अन्य पिकांचा समावेश होता. डाळिंब बागांचा यामध्ये समावेश नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा सर्वाधिक फटका बसला होता. डाळिंब बागांवरील कीड रोगाचेही सर्वेक्षण झाले पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. म्हणूनच केंद्र आणि राज्य शासनाने यावर्षापासून कीडरोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्पात डाळिंब बागांचा समावेश केला आहे. १ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील सात हजार ४०० हेक्टरवरील डाळिंब बागातील कीडरोगाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात येणार आहे. येत्या चार दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात सर्वेक्षण होणार आहे. यातून डाळिंब बागांमध्ये कोणत्याप्रकारे किती क्षेत्रावर किडीचा फैलाव झाला आहे, याचा अंदाज येणार आहे. डाळिंब बागातील कीड रोगाच्या संशोधनाचा शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल, असे जमदाडे यांनी सांगितले. दरम्यान, जत तालुक्यातील डाळिंब बागांवर तेल्याचा फैलाव असल्यामुळे तेथे संशोधकांना पाठवून अहवाल देण्याची सूचना दिली आहे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)बागांची पाहणी केवळ औपचारिकताजत तालुक्यातील व्हसपेठ, माडग्याळ, गुड्डापूर, दरीबडची, जालिहाळ, सिध्दनाथ आदी परिसरातील शंभर ते दीडशे एकर बागांवर तेल्या (बिब्ब्या) रोगाचा फैलाव वाढला आहे. म्हणून डाळिंब बागांना कृषी विभाग अधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाहणी करण्याची औपचारिकता पार पाडली आहे. डाळिंब बागांवर कोणते कीटकनाशक फवारल्यास रोग नियंत्रणात येईल, याविषयी मार्गदर्शन झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांची घोर निराशा झाली. कृषी विभागाच्या गलथान कारभाराबद्दल शेतकऱ्यांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.
डाळिंब बागांतील रोगाचे सर्वेक्षण करणार
By admin | Updated: August 26, 2014 22:53 IST