सांगलीतील मदनी ट्रस्टने महापूर तसेच कोरोनाच्या कालावधीत प्रशासनाला साथ देत आपत्ती निवारणासाठी माेठी यंत्रणा राबविली. महापुराच्या काळात बाधित झालेल्या १५ हजारहून अधिक कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. कोरोनाच्या देशव्यापी संकटात दोन महिने सातशे लोकांना दरराेज जेवण पुरविले. १२ हजारांहून अधिक जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. प्रशासनाला दोन रुग्णवाहिका मोफत दिल्या. सर्व जातीधर्माच्या मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला. कोरोनाच्या रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यासाठी मदत केली. कोरोनाच्या काळात कार्यरत डॉक्टर, रुग्णवाहिका चालक, प्रशासनातील अधिकारी, स्वयंसेवक यांच्या वाहनांची देखभाल दुरुस्ती केली. रक्तदान शिबिर घेतले. विविध सामाजिक उपक्रम राबवून नागरिकांना मदत केली.
प्रशासनाबरोबर समन्वय राखून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हा उपक्रम प्रत्येक घरापर्यंत पाेहाेचविण्यासाठी काम केले. दिव्यांगांना जीवनावश्यक किटचे वाटप केले. या सर्व कार्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सन्मानपत्र देऊन मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याचे कौतुक केले. सामाजिक संस्थांनी साथ दिल्यास अनेक योजना यशस्वी होतात आणि लोकांनाही मदत मिळते. अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद, ट्रस्टचे महासचिव सुफीयांन पठाण उपस्थित हाेते.
फाेटाे : ०७ ग्राम १
ओळ : सांगलीतील मदनी चॅरिटेबल ट्रस्टला जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चाैधरी यांनी सन्मानपत्र देऊन गाैरविले. यावेळी हाफिज सद्दाम सय्यद. सुफियान पठाण उपस्थित हाेते.