सांगली : जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांशी संबंधित पाच सूतगिरण्यांवर थकीत कर्जवसुलीसाठी जिल्हा बँकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. या सूतगिरण्यांची मालमत्ता विक्री करण्यासाठी बँकेने ३० एप्रिलपर्यंत निविदा मागवल्या आहेत. संबंधित सूतगिरण्यांकडे तब्बल १३४ कोटी ४२ लाख रुपयांची केवळ मुद्दलाची थकबाकी आहे. त्यावर कोट्यवधींचे व्याज आहे. बँकेने यापूर्वीही या सूतगिरण्यांचा लिलाव जाहीर केला होता. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे जिल्हा बँकेने फेरनिविदा मागवल्या आहेत.स्वामी रामानंद भारती सहकारी सूतगिरणी : तासगाव, खानापूर तालुका को-ऑप. स्पिनिंग मिल्स : विटा, शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी : इस्लामपूर, प्रतिबिंब मागासवर्गीय को-ऑप. इंडस्ट्रिज : इस्लामपूर व विजयालक्ष्मी कॉटन मिल्स : आटपाडी या पाच सूतगिरण्यांचा यात समावेश आहे. या सर्व सूतगिरण्यांकडे मिळून डिसेंबर २०२४ अखेर केवळ मुद्दलाची १३४ कोटी ४२ लाख ५२ हजार रुपये थकबाकी आहे.यावरील थकीत व्याजही कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. या संस्थांच्या लिलावासाठी निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. ६ मे रोजी निविदा उघडल्या जाणार आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली.जिल्हा बँकेला या संस्थांची विक्री करावीच लागणारजिल्हा बँकेने सिक्युरिटायझेशन ॲक्ट अंतर्गत या सूतगिरण्या ताब्यात घेतल्या आहेत. बँकेने यापूर्वी या सर्व संस्थांचा लिलाव जाहीर केला होता, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे यातील शेतकरी विणकरी, प्रतिबिंब मागासवर्गीय व विजयालक्ष्मी कॉटन मिल या तीन सूतगिरण्या जिल्हा बँकेने मार्च २०२० मध्ये स्वत: खरेदी केल्या. बँकेने खरेदी केलेल्या कर्जदार संस्थांची सात वर्षांत विक्री करून बँकेची कर्जवसुली करणे कायद्याने बंधनकारक आहे. या संस्था खरेदीला मार्चमध्ये पाच वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे या संस्थांकडील कर्जवसुली कोणत्याही स्थितीत आता बँकेला करावी लागणार आहे.
दिग्गज नेत्यांच्या संस्थाजिल्हा बँकेने लिलाव पुकारलेल्या पाच सूतगिरण्या सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांशी संबंधित आहेत. विशेष म्हणजे यातील दोन संस्थांचे संचालक जिल्हा बँकेतही संचालक आहेत. शेतकरी विणकरी व प्रतिबिंब सूतगिरणी माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्याशी संबंधित आहेत. स्वामी रामानंद भारती सूतगिरणी जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील व माजी आमदार सुमन पाटील यांच्याशी संबंधित आहे. खानापूर विणकरी सूतगिरणी आमदार सुहास बाबर व जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर यांच्याशी, तर विजयालक्ष्मी कॉटन मिल ही सूतगिरणी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्याशी संबंधित आहे.
पाच सूतगिरण्यांकडे थकबाकी
- स्वामी रामानंद भारती सहकरी सूतगिरणी तासगाव ४५.८१
- खानापूर तालुका को-ऑप. स्पिनिंग मिल्स विटा १७.९९
- शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी इस्लामपूर ४९.३१
- प्रतिबिंब मागासवर्गीय को-ऑप. इंडस्ट्रीज इस्लामपूर ७.५५
- विजयालक्ष्मी कॉटन मिल्स आटपाडी १३.७४