मिरज : शिंदेवाडी (ता. मिरज) येथे गावाला पाणीपुरवठ्यासाठी ग्रामपंचायतीने ओढापात्रात बेकायदा विहीर खुदाई केल्याची तक्रार शेतकरी पांडुरंग रणदिवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
शिंदेवाडी येथे पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांनी ओढापात्रालगत विहिरीची खुदाई केली आहे. खोदकामानंतर ग्रामपंचायतीच्या उताऱ्यावर या खासगी मालकीच्या जागेची बेकायदा नोंद करून ग्रामपंचायतीने संमतीशिवाय विहीर खुदाई केल्याचा आरोप रणदिवे यांनी केला आहे. ओढा पात्रात विहीर खुदाईमुळे ओढ्यातून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह थांबला आहे. विहिरीतून पाणी पुरवठ्यासाठी शेजारील विद्युत खांबावरून आकडा टाकून वीज चोरून वापरण्यात आली आहे. याकडेही महावितरणचे दुर्लक्ष आहे. बेकायदा विहीर खुदाईप्रकरणी संबंधितांवर कारवाईची मागणी पांडुरंग रणदिवे व अविनाश रणदिवे यांनी केली आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा रणदिवे यांनी दिला आहे. शिंदेवाडीत विहिरीच्या वादाबाबत सरपंच, उपसरपंचांनी तक्रार खोटी असल्याचे सांगितले. गावातील नागरिकांना पिण्याच्या पाणी मिळावे, यासाठी लोकवर्गणीतून ओढा पात्रात विहीर खोदली असल्याचेही त्यांनी सांगितले.