सांगली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नावे डिजिटल लोकविद्यापीठ सुरु करण्यात येणार आहे. समितीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक रत्नागिरी येथे झाली, त्यावेळी हा निर्णय झाला. आंतरधर्मीय वधूवर मंडळही सुरु करण्याचे निश्चित झाले.बैठकीसाठी १७ जिल्ह्यांतून १२५ कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रचारासाठी 'डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ' स्थापन करणे आणि त्याद्वारे विविध ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय बैठकीत झाला.अन्य ठराव असे : जादूटोणाविरोधी कायदा राष्ट्रीय पातळीवर होण्यासाठी पाठपुरावा, सुशिक्षितांच्या अंधश्रध्देविषयी प्रबोधन अभियान, आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह, सत्यशोधकी विवाह करू इच्छिणाऱ्यांची माहिती संकलित करणे, त्यांच्यासाठी राज्यस्तरीय आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह वधू- वर सूचक मंडळ सुरू करणे, जोडीदाराची विवेकी निवड आणि मानसिक आरोग्याविषयी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणे, समाज माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या अंधश्रद्धांविरोधात काम करणे, मोबाईलच्या व्यसनाविरोधात मोहीम सुरु करणे.बैठकीला अभिजित हेगशेट्ये, नित्यानंद भुते, मिलिंद देशमुख, रामभाऊ डोंगरे, मुक्ता दाभोलकर, राहुल थोरात, हमीद दाभोलकर, सम्राट हटकर, नंदिनी जाधव, राजीव देशपांडे, अनिल चव्हाण, अण्णा कडलास्कर, दिपक गिरमे, गणेश चिंचोले आदी उपस्थित होते.
मार्चमध्ये नागपुरात महिला परिषदनागपूर येथे मार्च महिन्यात राज्यव्यापी 'अंधश्रद्धा निर्मूलन महिला परिषद' घेण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले. तसेच समितीतर्फे 'संघटना बांधणी अभियान' फेब्रुवारी ते मेदरम्यान राबवण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत मध्यवर्तीचे दोन प्रतिनिधी महाराष्ट्रातील अंनिसच्या सर्व शाखांना भेटी देतील.