कवठेमहांकाळ (जि. सांगली) : कवठेमहांकाळचे एस.टी. आगारप्रमुख अमर निकम यांना कार्यालयात घुसून तीन ते चारजणांनी बेदम मारहाण केली, तसेच त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यात आली.कवठेमहांकाळ एस.टी. डेपो डेपोतील कंडक्टर तानाजी दामू यमगर हा अरेरावी, दमदाटी, शिवीगाळ करतो, अशी लेखी तक्रार डेपोतील क्लार्क अनिता प्रमोद जगताप यांनी आगार व्यवस्थापक अमर निकम यांच्याकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून आगार व्यवस्थापक अमर निकम यांनी वाहक तानाजी यमगर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.या कारवाईचा राग मनात धरून वाहक तानाजी यमगर यांनी व्यवस्थापक अमर निकम यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना निलंबनाचा जाब विचारला. यावेळी वादावादी होऊन आगार व्यवस्थापक यांना वाहक यमगर व सोबतच्या दोन ते तीन महिलांनी बेदम मारहाण केली.निकम यांना मारहाण करत महिलांनी दिसेल त्या वस्तू घेऊन निकम यांच्याकडे भिरकावल्या.निकम हे आपल्याला मारू नका, असे विनवणी करत होते, परंतु त्यांचे कोणीही ऐकले नाही. या घटनेची रात्री उशिरापर्यंत कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती. पण, थेट आगार व्यवस्थापकाला केबिनमध्ये घुसून मारहाण केल्यामुळे एस.टी. डेपोमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
मला मारहाण करणाऱ्या महिलांना आपण अरेरावी किंवा वाईट बोललो नाही तरीपण फक्त चुकीचे कृत्य केल्यामुळे निलंबन केल्याचा राग मनात धरून मला बेदम मारहाण त्यांच्याकडून करण्यात आली. हा दहशत माजविण्याचा प्रकार आहे - अमर निकम, एसटी आगार व्यवस्थापक, कवठेमहांकाळ