सांगली : कवठेमहांकाळ येथील नानासाहेब सगरे को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने ग्राहक न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा ठेवीदाराची रक्कम परत न दिल्याबद्दल सात संचालकांना एक वर्ष साधी कैद व प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश प्रमोद गिरीगोस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली मनीषा वनमोरे व अर्पिता फणसळकर यांच्या पीठाने हा आदेश दिला.संस्थेचे व्यवस्थापक शिवलिंग मुरग्याप्पा आरळी, उपाध्यक्ष सुकुमार बाबा कोठावळे (दोघे रा. कवठेमहांकाळ), संचालक सुहास शिवाजी पाटील (रा. आगळगाव), सत्यवान परशुराम कुंभारकर (रा. शिंदेवाडी एम.), दत्तात्रय कृष्णा माळी (रा. कोकळे), शहाजी रामचंद्र एडके (रा. म्हैसाळ एम.) आणि विश्वास भगवान पवार (रा. देशिंग) अशी शिक्षा झालेल्या संचालकांची नावे आहेत. अध्यक्षांसह चार संचालक मृत झाल्याने त्यांना निर्दोष सोडले.नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील ठेवीदार बाळाराम आनंदा शिंदे यांनी सगरे पतसंस्थेत ठेव ठेवली होती. मुदत संपल्यानंतर वारंवार पाठपुरावा करूनही संस्थेने ठेवीची रक्कम परत केली नाही. अखेर शिंदे यांनी सांगलीतील ग्राहक न्यायालयात तक्रार केली होती. त्यावर सुनावणी झाली. संस्थेने ३ लाख १७ हजार रुपयांच्या ठेवी व त्यावरील व्याज तसेच मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल ५ हजार रुपये आणि अर्जाचा खर्च म्हणून ३ हजार रुपये ४५ दिवसात बाळाराम शिंदे यांना परत देण्याचे आदेश दिले. ३१ ऑगस्ट २०१६ रोजी हा निकाल दिला होता. न्यायालयाच्या आदेशानंतरही संस्थेने ठेवीची रक्कम दिली नाही. त्यामुळे शिंदे यांनी ग्राहक संरक्षण कायदा कलम २७ नुसार ॲड. एस. आर. कुडाळकर व ॲड. दत्तात्रय जाधव यांच्यामार्फत ग्राहक न्यायालयात खटला दाखल केला. त्यावर सुनावणी होऊन संचालक मंडळाला दोषी ठरवले. सात जणांना एक वर्ष साधी कैद व प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
Sangli: आदेशानंतरही ठेवीची रक्कम दिली नाही; कवठेमहांकाळच्या सगरे पतसंस्थेच्या सात संचालकांना शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 18:52 IST