लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शेतकरी महिला दिनानिमित्त सोमवारी सांगलीत जनवादी महिला संघटनेने केंद्र शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाविरुद्ध निदर्शने केली.
संघटनेचे कॉ. उमेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदाेलन करण्यात आले. यावेळी संघटनेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, देशभरातील शेतकरी लाखोंच्या संख्येने दिल्लीच्या सीमेवर गेले ५० दिवस संयमाने, शांततेने परंतु अत्यंत निर्धाराने हजारो सशस्त्र पोलिसांसमोर निःशस्त्रपणे उभे ठाकले आहेत.
शेतकऱ्यांनी सुरू केलेली ही लढाई आहे. ६० टक्के लोकसंख्या असलेल्या शेतकरी, शेतमजुरांची, ग्रामीण भारतातील सर्वच श्रमिकांची आणि संविधान व लोकशाही मानणाऱ्या मध्यमवर्गीय बुद्धीमंतांची ही लढाई आहे. मोदी-शहा सरकारने जून २०२०मध्ये संसदेला न जुमानता अध्यादेश जारी केले. देशाच्या उद्योग व्यवस्थेचा कणा असणाऱ्या कामगारांविरोधात कट केल्याप्रमाणे संपूर्ण कामगार कायदेच मोडीत काढले आहेत. देशभर शेतकरी महिला दिन साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त सोमवारी जनवादी महिला संघटनेकडून केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी रेहाना शेख, नंदा जगताप, शोभा कोल्हे, उज्ज्वला वाघमारे, आशा माळी, जोहरा नदाफ आदी उपस्थित होते.