सांगली : कोऱोना रूग्णांची संख्या देशभर व महाराष्ट्रात कमी होत असल्याने लॉकडाऊन शिथील करण्यात येत आहे. या स्थितीत मिरज, कोल्हापुरातून पॅसेंजर गाड्या सुरु करण्याची मागणी सांगली रेल डेव्हलपमेंट ग्रुपने केली आहे. या ग्रुपतर्फे उमेश शहा, करण शहा आदींनी रेल्वेमंत्र्यांना निवेदने पाठवली आहेत.
त्यांनी सांगितले की, मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ आदी भागात लोकल व पॅसेंजर गाड्या सुरु झाल्या आहेत. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना प्रवासाला मुभा दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रात मात्र पॅसेंजर गाड्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे सामान्य जनतेचे हाल होत आहेत. अत्यावश्यक स्वरुपातील पॅसेंजर त्वरित सुरु करण्याची गरज आहे. यामध्ये सांगली - क़ोल्हापूर डेमू, सातारा - कोल्हापूर डेमू, मिरज - बेळगाव आणि मिरज ते पंढरपूर पॅसेंजरचा समावेश आहे. तसेच बंद असलेल्या काही गाड्या सुरु करुन त्यांचा विस्तारही करण्याची गरज आहे. सोलापूर - मिरज एक्सप्रेस, बेळगाव - मिरज पॅसेंजर, कोल्हापूर - मिरज पॅसेंजर या गाड्या सांगली किंवा कऱ्हाडपर्यंत विस्तारीत केल्यास हजारो प्रवाशांची सोय होईल.