उघडी रोहित्रे बनली धोकादायक
करगणी : तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत कंपनीची रोहित्रे खुल्या अवस्थेत पडून आहेत. वीजप्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. त्यापासून केव्हाही मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गुटख्याची खुलेआम विक्री
मिरज : शासनाने गुटख्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे; परंतु तालुक्यात खुलेआम गुटखा विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
कचऱ्याचे व्यवस्थापन करा
तासगाव : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे पसरून राहतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी होत आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे लावा
सांगली : खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश शासनाने दिले होते. मात्र, यासाठी अनुदानाची तजवीज शासनाने करून दिली नसल्याने अजूनपर्यंत जिल्ह्यातील एकाही शाळेने सीसीटीव्ही कॅमेरे लावले नाहीत. त्यामुळे धाेका आहे.
गतिरोधकाची गरज
सांगली : सांगलीतील पटेल चौक ते कॉलेज कॉर्नर मार्गावर भरधाव वाहतूक होत असल्याने गतिरोधक निर्माण करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. गतिरोधकाअभावी या ठिकाणी अनेकदा अपघात घडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी गतिराेधकाचे बांधकाम करावे, अशी मागणी आहे.
शहरातील अनेक भागांमध्ये पथदिवे बंद
सांगली : संजयनगर, जुना बुधगाव रस्ता परिसरात पथदिवे लावण्यात आले आहेत. मात्र, यातील अनेक पथदिवे बंद आहेत. या मार्गावर रात्री व पहाटेला शेकडाे नागरिक फिरण्यासाठी जातात. त्यामुळे महापालकेने या मार्गावर पथदिवे लावले आहेत.
सांगलीत गटारी तुंबल्या
सांगली : सांगलीतील कॉलेज कॉर्नर येथे मोठी गटार असून ती स्वच्छता करण्याची महापालिकेकडे यंत्रणाच नाही. यामुळे गटारीत दगड, घाण साचून राहिल्यामुळे तुंबली आहे. काही गटारी तर वर्षातून एकदाच पावसाळ्यापूर्वी उपसल्या जातात. ही अतिशय गंभीर बाब असून गटारी स्वच्छतेकडे महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
मध संकलनाच्या प्रशिक्षणाची मागणी
सांगली : जिल्ह्यात मध संकलनाला चांगला वाव आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मध संकलनाचे प्रशिक्षण दिल्यास चांगल्या दर्जाचे मध संकलन होण्यास मदत होईल. त्यामुळे मध संकलनाचे प्रशिक्षण देण्याची मागणी केली जात आहे.