लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत बुधवारी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने काँग्रेस भवनसमोर आंदोलनही करण्यात आले.
यावेळी डाॅ. संजय पाटील, सतीश साखळकर, राहुल पाटील यांच्यासह क्रांती मोर्चाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, असे प्रयत्न चालले आहेत. मंत्री विजय वडेट्टीवार हे कायम मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेत आहेत. तसेच त्यांच्याकडे असलेला सारथी संस्थेचा अतिरिक्त भारही या भूमिकेमुळे काढून घेण्यात आला आहे.
ते सातत्याने आरक्षणविरोधी वक्तव्य करीत असल्याने काँग्रेसबद्दल मराठा समाजाचा रोष वाढत आहे. तरी वडेट्टीवार यांनी मंत्रिपदाचा तत्काळ राजीनामा द्यावा; अन्यथा त्याचे गंभीर परिणाम पक्षाला भोगावे लागतील, असा इशाराही देण्यात आला.