इस्लामपूर : सरकारने कर्ज आणि भागभांडवल देताना आखडता हात घेतला; मात्र काटेकोर नियोजन आणि काटकसर या बळावर दीनदयाळ सूतगिरणीने आपली वाटचाल नेहमीच यशस्वी केली आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्म मानवतावादाचा विचार घेऊन समाजातील शेवटच्या घटकातील माणसाचा विकास साधण्याचा प्रयत्न आहे. यापुढे कितीही संकटे आली, तरी सभासदांच्या हिताचाच कारभार करू, अशी ग्वाही माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी दिली.
वाघवाडी (ता. वाळवा) येथील कार्यस्थळावर दीनदयाळ मागासवर्गीय सूतगिरणीची २६ वी वार्षिक सभा झाली. यावेळी संस्थापक अण्णासाहेब डांगे यांनी मार्गदर्शन केले. सूतगिरणीचे अध्यक्ष मारुती कांबळे अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष प्रकाश बिरजे, माजी आमदार भगवानराव साळुंखे, संभाजी कचरे, प्रा. अरुण घोडके, अविनाश खरात, कार्यकारी संचालक ॲड. चिमण डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डांगे म्हणाले, सूतगिरणीच्या स्थापनेपासून तीन वर्षांचा अपवाद वगळता ४४ कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे. यावर्षी १ कोटी १८ लाख रुपये नफा झाला आहे. सरकारचे पैसे आणि आतापर्यंतचा नफा मिळून आज सूतगिरणीची ९५ कोटींची मालमत्ता झाली आहे. ही सूतगिरणी सर्व सभासदांच्या मालकीची आहे. सभासदांना भेटवस्तू देणारी दीनदयाळ देशातील एकमेव सूतगिरणी आहे.
मारुती कांबळे यांनी या आर्थिक वर्षात संस्थेने ५२ कोटी रुपयांची उलाढाल करत १ कोटी १८ लाख रुपये नफा मिळवल्याचे सांगितले. ॲड. चिमण डांगे यांनी सभेचे नोटीस वाचन केले. प्रकाश बिरजे यांनी स्वागत केले. सभेतील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. दीपक थोरात, रघुनाथ कळसे, सागर बडदे, दिलीप कांबळे, विकास खोत, ज्ञानदेव शिंदे, राम शंकर या गुणवंत कामगारांचा गौरव करण्यात आला.
साळुंखे म्हणाले, अण्णासाहेब डांगे हे दीनदयाळ उपाध्याय यांचा विचार आणि प्रेरणा घेऊन कृतिशील जीवन जगत आहेत. त्यांनी घालून दिलेल्या आदर्शाच्या वाटेवर सूतगिरणीची वाटचाल सुरू आहे. ॲड. संपतराव पाटील, संभाजी कचरे, प्रा. अरुण घोडके यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सुमंत महाजन, बाळासाहेब खैरे, अशोक एडगे, विलास काळेबाग, मंगल पवार, माणिक गोतपागर, अनिल शेटके आदी उपस्थित होते.
फोटो : २५ इस्लामपुर२
ओळ : इस्लामपूर येथील दीनदयाळ सूतगिरणीच्या सभेत अण्णासाहेब डांगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रकाश बिरजे, मारुती कांबळे, संपतराव पाटील, सुमंत महाजन, बाळासाहेब खैरे, सुनील मलगुंडे उपस्थित होते.