सांगली : साखर कारखान्यांची एफआरपी तीन हजार ४०० रुपयांपेक्षा कमी असेल त्यांनी तीन हजार ५०० रुपये दर द्यावेत. तसेच ज्या कारखान्यांची एफआरपी तीन हजार ४०० रुपयांपेक्षा जास्त असेल त्यांनी एफआरपी अधिक १०० रुपये दर द्यावा, असा प्रस्ताव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी बैठकीत ठेवला.
या प्रस्तावावर संचालक मंडळाशी चर्चा करून १२ नाेव्हेंबरला निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींनी दिले. यामुळे ऊस दराची कोंडी दि. १२ रोजी फुटण्याची शक्यता आहे.ऊस दराची कोंडी फुटण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची शुक्रवारी बैठक घेतली. या बैठकीस माजी खासदार राजू शेट्टी, कोल्हापूरच्या प्रादेशिक साखर सहसंचालक संगीता डोंगरे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष राजू शेट्टी, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे आणि जिल्ह्यातील सर्व कारखान्यांचे कार्यकारी संचालक उपस्थित होते.राजू शेट्टी यांनी चालू गळीत हंगामातील उसाला प्रतिटन तीन हजार ७५१ रुपये दर द्यावेत. मागील हंगामात गाळपास गेलेल्या उसाला प्रतिटन २०० रुपये मिळावेत, अशी मागणी केली.
यावर कारखानदार आणि प्रशासनामध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. संघटनेच्या मागणीनुसार दर देणे परवडत नसल्याची भूमिका राजारामबापू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी मांडली. माहुली यांच्या भूमिकेला अन्य कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनीही पाठिंबा दिला.यावर तोडगा काढण्यासाठी राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील फॉर्म्युला कारखानदारासमोर ठेवला. शेट्टी म्हणाले, कारखान्याची एफआरपी तीन हजार ४०० रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांनी एकरकमी प्रतिटन तीन हजार ५०० रुपये आणि ज्या कारखान्याची एफआरपी तीन हजार ४०० रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांनी एफआरपी अधिक प्रतिटन १०० रुपये जास्त द्यावेत. शेट्टी यांच्या या प्रश्नावर कारखानदारांनी १२ नोव्हेंबरपर्यंत मुदत मागितली असून, त्यानंतर तोडगा काढण्याचा निर्णय झाला.
शेतकऱ्यांनी वजन करून आणलेला ऊस स्वीकारा : संगीता डोंगरेशेतकऱ्यांनी स्वता ऊस तोडून वाहतूक आणि वजन करून आणल्यास तो सर्व कारखान्यांनी स्वीकारला पाहिजे. एकाही शेतकऱ्यांची कारखानदारांनी अडवणूक करू नये, अशी सूचना कोल्हापूरच्या प्रादेशिक साखर सहसंचालक संगीता डोंगरे यांनी कारखान्याच्या प्रशासनास दिल्या.
कोण काय म्हणाले?
- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा : साखर कारखान्यांचा खोटे ताळेबंद तयार करणाऱ्या लेखापरीक्षकांवर गुन्हे दाखल करा. मागील हिशेब झाल्याशिवास कारखाने चालू ठेवू नका.
- भागवत जाधव : गोपीनाथ मुंडे महामंडळाच्या कपातील विरोध असून ‘आरएसएफ’नुसार हिशेब दिला नसताना गाळप परवाना दिला कसा? :
- आर. डी. माहुली : साखर आयुक्त, न्यायालयाच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांची १०० टक्के देणी देणार
- महेश खराडे : निर्णय घेणारे कारखान्याचे प्रतिनिधीच बैठकीला आले पाहिजेत.
तिढा काय..?
- मागील हंगामातील थकीत एफआरपी आधी द्या.
- ऊसतोडणी-वाहतूकमध्ये मखलाशी करून एफआरपी चोरी केलेल्या कारखान्यांवर कारवाई करा.
- शेतकऱ्यांनी वजन करून आणलेला ऊस कारखान्यांनी स्वीकारावा.
जिल्हाधिकाऱ्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदनजिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी ऊस दराच्या प्रश्नावर बैठक घेतल्याबद्दल त्यांचे शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले.
Web Summary : Sugar factories may offer ₹3500/ton if FRP is below ₹3400. Meeting held; decision on Nov 12. Farmers seek ₹3751/ton. Collector facilitated talks.
Web Summary : सांगली: चीनी मिलें एफआरपी 3400 रुपये से कम होने पर 3500 रुपये प्रति टन का प्रस्ताव दे सकती हैं। 12 नवंबर को निर्णय। किसानों ने 3751 रुपये प्रति टन की मांग की।