कोकरूड : चिंचोली (ता. शिराळा) येथील डी. आर. जाधव यांनी मातीतील कुस्तीचा प्रचार आणि प्रसार करत पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करुन राष्ट्रपती पदक पटकावले. याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
मानसिंगराव नाईक म्हणाले, चिंचोलीसारख्या छोट्या गावातील युवकांनी आपल्या कर्तृत्वाने गावाचे नाव संपूर्ण राज्यात केले आहे. डी. आर. जाधव यांनीही पोलीस दलात चांगली कामगिरी करत राष्ट्रपती पदक मिळवून गावाचे नाव मोठे केले आहे. नोकरी करत अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष या पदाच्या माध्यमातून ते मातीतील कुस्तीचा प्रचार, प्रसार करत आहेत. राज्यातील अनेक मल्लांना दत्तक घेऊन त्यांनी सोयी, सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.
यावेळी उपसभापती बाळासाहेब नायकवडी, दाजी सकटे, डॉ. नंदकुमार पाटील, संपतराव जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला डॉ. नंदकुमार पाटील, संपतराव जाधव, सरपंच फत्तेसिंग पाटील, उपसरपंच सुरेश जाधव, नारायण जाधव, प्रल्हाद जाधव, प्रकाश जाधव, अमर जाधव, ज्ञानदेव पाटील, केशव जाधव, मोरेवाडी सरपंच अशोक डिगे, तानाजी जाधव, शिवाजी जाधव, भरत चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रकाश जाधव यांनी स्वागत केले तर शिवाजी जाधव यांनी आभार मानले.