ऐतवडे बुद्रुक : हवामान आधारित पीकविमा योजनेंतर्गत बाधित शेतकऱ्यांंना विम्याचे पैसे ३१ जानेवारीपर्यंत न मिळाल्यास गाव बंद ठेवून तालुका कृषी कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) ग्रामसभेत देण्यात आला.प्रजासत्ताकदिनी झालेल्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच संग्राम गायकवाड होते. पीकविमा योजनेंतर्गत ऐतवडे बुद्रुकसह कुरळप मंडलातील अनेक शेतकऱ्यांना लाभ होऊन पीकविमा रक्कम मिळणे गरजेचे आहे. याबाबत ऐतवडे बु. क्र. १ सेवा सोसायटीचे अध्यक्ष शहाजी गायकवाड यांनी कृषी विभाग व संबंधित विमा कंपनी यांच्याकडे विमा रकमेबाबत वारंवार पाठपुरावा केला होता, परंतु दरवेळी केवळ आश्वासनच देण्यात येत होते. यामुळे जानेवारीपर्यंत पीक विम्याची रक्कम न मिळाल्यास २ फेब्रुवारीला गाव बंद ठेवून तालुका कृषी कार्यालयास टाळे ठोकण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.त्याचप्रमाणे ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे दर मिळावा व गावची कोरडवाहू शाश्वत शेती अभियान अंतर्गत निवड होण्यासाठी माजी मंत्री जयंत पाटील व आ. शिवाजीराव नाईक यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे या दोघांच्याही अभिनंदनाचा ठराव बहुमताने संमत करण्यात आला. ग्रामसभेस पंचायत समिती सदस्य अरविंद बुद्रुक, राजारामबापू बँकेचे संचालक शहाजी गायकवाड, सूतगिरणीचे संचालक राजेंद्र दिंडे, सरपंच संग्राम गायकवाड, उपसरपंच प्रमिला कांबळे, ग्रामसेवक कुबेर कांबळे, डॉ. अनिल बुद्रुक उपस्थित होते. (वार्ताहर)
पीक विमाप्रश्नी गावबंदचा ठराव
By admin | Updated: January 29, 2015 00:06 IST